इचलकरंजी : शहरातील खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये वाढ करण्याच्या प्रकरणी येथील प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये सुमारे दीड तास चर्चा होऊनही कोणताही निर्णय झाला नाही. याबाबत सोमवारी (दि. १६) पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी घोषित केले. यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये झालेली वाढ, वीजदरामध्ये झालेली वृद्धी, वाढलेली महागाई अशा पार्श्वभूमीवर खर्चीवाले यंत्रमागधारकांना प्रतिमीटर ५२ पैसे मजुरीवाढ मिळावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व यंत्रमागधारक जागृती संघटना यांनी इचलकरंजी क्लॉथ अँड यार्न मर्चंटस् असोसिएशन या व्यापारी संघटनेकडे केली. याबाबत कोणतीही दखल व्यापारी संघटना घेत नसल्याने यंत्रमागधारकांच्या संघटनांनी प्रांताधिकारी जिरंगे यांच्याकडे दाद मागितली. या विषयावर प्रांत कार्यालयात झालेल्या चार बैठकांमध्ये निर्णय झाला नाही. म्हणून सोमवारी प्रांताधिकाऱ्यांनी पुन्हा बैठक बोलावली होती. सोमवारच्या बैठकीस व्यापारी संघटनेचे घन:शाम इनाणी, रामपाल भंडारी, राजाराम चांडक, भंवरलाल चौधरी, राजाराम भुतडा, यंत्रमागधारक संघटनांचे सतीश कोष्टी, विनय महाजन, नारायण दुरुगडे, राहुल निमणकर, सूरज दुबे, सहायक कामागार आयुक्त अनिल गुरव, आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी जिरंगे यांनी, वाढलेला वीजदर, कामगारांच्या मजुरीमध्ये झालेली वाढ आणि महागाई यांचा विचार करता व्यापाऱ्यांनी मजुरीमध्ये ठोस वाढ सूचविण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर बोलताना व्यापारी संघटनेच्यावतीने इनाणी यांनी, कामगारांना देण्यात आलेली सात पैसे मजुरीवाढ व्यापारी देण्यास आहेत, असे सांगितले. सुमारे दीड तास चर्चा होऊनही बोलणी पुढे सरकत नसल्याचे पाहून प्रांताधिकाऱ्यांनी यावर दोन्ही बाजूंनीसुद्धा समन्वय घडावा, अशी चर्चा करण्याचे आवाहन केले. तेव्हा उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून इनाणी यांनी दहा पैसे मजुरीवाढ देण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचे यंत्रमागधारक संघटनेचे म्हणणे पडले. बोलणी पुढे सरकत नसल्याचे पाहून प्रांताधिकाऱ्यांनी १६ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीस दोन्हीही संघटनांनी निर्णायक चर्चा करण्याच्यादृष्टीने तयारी करून येण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) यंत्रमाग उद्योगातील मंदी ऐरणीवर सोमवारच्या प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीत यंत्रमाग उद्योगात मंदी असल्याचा मुद्दा प्रकर्षाने उठविण्यात आला. यंत्रमागावर निर्मित कापडासाठी उत्पादन खर्चाइतका कापड भाव मिळत नसल्याने कपडा उद्योग नुकसानीत आला आहे. याचा परिणाम म्हणून अनेक कापड उत्पादकांनी स्वत:चे कापड उत्पादन बंद करून खर्चीवाले पद्धतीने मजुरीवर (जॉब वर्क) यंत्रमाग कारखाने सुरू ठेवले आहेत. कापड उत्पादक व्यापाऱ्यांनाही प्रचंड नुकसान बसल्याने सध्या देण्यात येणारी मजुरीसुद्धा परवडत नाही, असा मुद्दा कापड व्यापाऱ्यांनी समोर आणला. त्यामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली.
मजुरीवाढीची बैठक निष्फळ
By admin | Published: February 09, 2015 11:21 PM