कोल्हापूर : लोकसभेबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत बोलावलेल्या कॉँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. मात्र, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ‘मला किंवा सतेज पाटील यांना आदेश द्या, आम्ही लोकसभा लढवतो,’ असे स्पष्ट करून या चर्चेला वेगळी दिशा दिली. तसेच कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेवर हक्क सांगितला.
मुंबई येथील टिळक भवनामध्ये गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. दिल्लीहून आलेले आशिष दुवा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, यशवंत हाप्पे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, गेली २० वर्षे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. आपला खासदार निवडून आला की प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस आम्हांला मदत करत नाही. तेव्हा हा मतदारसंघच कॉँग्रेसकडे घ्या. यावेळी चर्चा सुरू असतानाच आमदार सतेज पाटील यांनी कॉँग्रेसला जागा घेऊन या ठिकाणी संजय मंडलिक यांचा चांगला पर्याय होऊ शकतो, असे सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस मंडलिक यांच्या नावाबाबत विचार करीत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आपण आणि पी. एन. पाटील एकत्र बसून यावर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. मात्र यावर पी. एन. पाटील यांनी तसे करण्यापेक्षा पक्षाने आदेश दिल्यास मी किंवा सतेज पाटील दोघांपैकी कुणीही लोकसभेला लढायला तयार असल्याचे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सतेज पाटील यांच्याकडे लोकसभा लढणार काय, असे विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला लोकसभेला स्वारस्य नसल्याचे सांगितले. तेव्हा पी. एन. यांनी पुन्हा पक्षाने आदेश दिल्यास मला किंवा सतेज पाटील यांना तो पाळावा लागेल, असे स्पष्ट केले. यावेळी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, तौफिक मुल्लाणी, राजू आवळे, सत्यजित जाधव, दीपक थोरात, बयाजी शेळके, दयानंद कांबळे, पार्थ मुंडे, उमेश पोर्लेकर, देवणे, दुर्वास कदम, आदी उपस्थित होते.राजू शेट्टींबाबत काय ते सांगा?हातकणंगले मतदारसंघाबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी पी. एन. पाटील म्हणाले, शेट्टींना घेऊन तुम्ही राहुल गांधी यांना भेटला आहात. तेव्हा त्यांच्याबाबत का निर्णय घ्यायचा, हे तुम्हीच आम्हांला सांगा. गेल्यावेळी कॉँग्रेसचा उमेदवार तेथून लढला आहे. तेव्हा तुम्हीच काय ते ठरवून सांगा, असे पाटील म्हणाले.शरद पवारांकडून ‘पी. एन.’ यांना बोलावणेराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चेसाठी आम्हांला बोलावले आहे. तेव्हा त्यांचे काय म्हणणे आहे तेही आम्ही बघतो, असे यावेळी चर्चेत पी. एन. पाटील यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई येथे टिळक भवनामध्ये गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीबाबतच्या चर्चेत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी भूमिका मांडली. यावेळी आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, राजू आवळे, प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.