कोल्हापूर: एनएमएस परीक्षेत अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात येत्या मंगळवारी (दि. ७) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत बैठक होणार आहे, अशी माहिती शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे एनएमएस परीक्षा अन्यायग्रस्त विद्यार्थी पालक सभेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार आसगावकर यांनी, न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ होते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्ग (ईडब्ल्यूएस) घटकावर अन्याय झाला आहे. त्यासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला. अध्यक्ष संकपाळ यांनी, शासन व न्यायालयीन स्तरावरील सर्व खर्च मुख्याध्यापक संघ करेल असे जाहीर केले.
बैठकीला संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, दत्ता पाटील, अजित रणदिवे, आय. ए. अन्सारू, श्रीकांत पाटील, जितेंद्र म्हैशाळे, ए. एम. पाटील, सचिन कोंडेकर, बी. एस. पाटील हे उपस्थित होते.