दरम्यान, महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय फेरीवाला समितीची बैठक झाली. यावेळी निमंत्रक आर.के. पोवार म्हणाले, फेरीवाल्यांना शासनाच्या नियम आणि आटीचे पालन करावे लागणार आहे. सर्वेक्षणामध्ये ५६०० फेरीवाले पात्र ठरले आहेत. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. मात्र, बेकायदेशीर केबिन उभारणाऱ्यांना सहकार्य केले जाणार नाही. महाद्वार चौकातील आवळे, रांगोळी विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नाही.
दिलीप पवार म्हणाले, शहरातील बांधकाम करून केलेल्या अतिक्रमणावरील कारवाईकडे कानाडोळा आणि हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई खपवून घेतली जाणार नाही. नागरिक म्हणून त्यांचा व्यवसाय करण्याचा आणि जगण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. नंदकुमार वळंजू यांनी महापालिकेने कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून तोडगा काढला पाहिजे, असे सांगितले. अशोक भंडारे यांनी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करतानाही योग्य व्यवसाय होईल अशा ठिकाणीच झाले पाहिजे, असे म्हटले. किशोर घाटगे, प्र.द.गणपुले आदींनी मनोगत व्यक्त केले.