कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वादग्रस्त टोलप्रश्नी रस्त्याच्या मूल्यांकनासाठी नव्या सरकारने नियुक्त केलेल्या समितीची बैठक येत्या १४ जानेवारीस मुंबईत होत आहे. या समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह समितीचे सदस्य बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्यत: पर्यायांवर चर्चा अपेक्षित असून, त्यानंतर ही समिती प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन प्रकल्पाचे फेरमूल्यांकन करणार आहे. आयआरबी कंपनीने केलेल्या ४९.४९ किलोमीटर रस्त्यांच्या खर्चाचे पुन्हा मूल्यांकन करण्याचा तसेच या मूल्यांकनासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २४ डिसेंबरच्या बैठकीत झाला. या समितीची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे त्यावेळी जाहीर झाले होते. त्यामुळे ही बैठक कधी होणार याची विचारणा ‘लोकमत’ने आज रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडे केली. त्यांनी १४ जानेवारीला बैठक होत असल्याचे स्पष्ट केले. ही समिती शहरातील रस्त्यांचे फेरमूल्यांकन करणार आहे. मूल्यांकनानंतर ‘आयआरबी’ची व्याजासह होणारी रक्कम कोणी व कशी द्यायची याबाबतचे पर्याय समितीने सूचवायचे आहेत. आयआरबीच्या रस्त्यांचे मूल्यांकन यापूर्वी कॉँग्रेस आघाडी सरकारने केले होते. त्याकरिता तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने मूल्यांकन नेमके किती केले, हे काही बाहेर आलेच नाही. नंतर रक्कम देण्याच्या पर्यायावर घोडे नडले. जनतेच्या मनातील निर्णय : मुख्यमंत्री आज, शनिवारी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार टोलप्रश्नी पर्यायांचा अभ्यास करणार असल्याचा पुनरुच्चार केला. टोलप्रश्नी कोल्हापूरच्या जनतेच्या मनात आहे, तसाच निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
१४ जानेवारीस मुंबईत बैठक
By admin | Published: January 04, 2015 1:13 AM