(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वस्त्रोद्योगाला गती देण्यासाठी शासन स्तरावरील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावून प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले. यावेळी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंत्रमाग व्यवसायातील अडचणींसंदर्भात यड्राव (ता. शिरोळ) येथे यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली होती. मंत्री यड्रावकर पुढे म्हणाले, यंत्रमागधारकांना पाच टक्के व्याज दरातील सवलत, २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीज बिलात ७५ पैसे सवलत, वीज जोडणी मल्टीपार्टी करणे, यासह काही मागण्यांबाबत मार्चमध्येच निर्णय घेण्यात आला होता. याबाबतची तरतूदही अर्थमंत्री पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केली होती. परंतु, कोरोनामुळे त्याला स्थगिती मिळाली आहे. याबाबत मुंबईत बैठक घेऊन यंत्रमागधारकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. तसेच वायडिंग व्यवसायालाही वस्त्रोद्योगामध्ये समावेश करण्यात येईल.
त्याचबरोबर यंत्रमागधारक प्रतिनिधींनी केवळ सरकारकडे बोट करून प्रश्न सुटणार नाहीत. या व्यवसायातील कारखानदारांनीदेखील अभ्यास करणे आवश्यक आहे. सध्या आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे कारखानदारांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही मंत्री यड्रावकर यांनी केले.
यावेळी अशोक स्वामी, विनय महाजन, सागर चाळके, रवींद्र माने, पुंडलिक जाधव, सुरज दुबे, आदींसह विविध यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
(फोटो ओळी)
२८१२२०२०-आयसीएच-१०
वस्त्रोद्योगातील समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी यड्राव (ता. शिरोळ) येथे बैठक झाली. त्यामध्ये वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनय महाजन, रवी माने, अशोक स्वामी, धैर्यशील माने, सागर चाळके, आदी उपस्थित होते.