कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील डाटा मायग्रेशनच्या अडचणीबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात व्यापक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.शिवाजी विद्यापीठात मार्च २०१६ पासून डाटा मायग्रेशनच्या प्रलंबित कामामुळे हजारो विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागला नाही; त्यामुळे अभ्यासक्रमांना प्रवेश देणे, ट्रान्सफर सर्टिफिकेट, पदवीप्रमाणपत्र आणि डुप्लिकेट मार्कशीट, आदी वेळेत मिळत नाहीत. परिणामी याबाबत विद्यार्थी, पालकांना मनस्ताप, मानसिक त्रास होत आहे. आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ज्या कंपनीस डाटा मायग्रेशनचे काम जमत नाही. त्या कंपनीस विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नोव्हेंबर २०१८ मध्ये नियमबाह्य मुदतवाढ दिली आहे; परंतु, मागील दीड महिन्यापासून डाटा मायग्रेशनचे काम बंद आहे. एकंदरीत डाटा मायग्रेशनच्या कामामध्ये गोंधळाची परिस्थिती असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
विद्यापीठाची परीक्षा मूल्यांकनाची गुणवत्ताही पूर्णपणे ढासळलेली आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या डाटा मायग्रेशन प्रकरणाची शासनस्तरावर उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली आहे. त्यावर पुढील आठवड्यात याबाबत व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री तावडे यांनी दिले.