लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यंत्रमाग व्यवसायातील वीज बिल सवलतीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भात गुरुवारी (दि. ३०) आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक होणार आहे. त्यामध्ये या विषयाला स्थगिती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चालू वीज बिलासह मागील थकबाकी ३० टक्के भरून उर्वरित रक्कम समान हप्त्यात भरण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
२७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांसाठी ७५ पैशांच्या अतिरिक्त सवलतीची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वस्त्रोद्योगातील प्रमुख समस्यांसंदर्भात आमदार आवाडे यांनी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, नारायण दुरूगडे यांचा समावेश होता. व्यवसायातील अडचणींमुळे थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील थकबाकी ३० टक्के भरून उर्वरित रकमेसाठी समान हप्ते करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. ७५ पैशांच्या सवलतीसंदर्भात अर्थसंकल्पात तरतूद केली आहे; पण त्याची अंमलबजावणी नाही. त्यामध्ये नेमकी अडचण पाहून सबसिडीचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री पवार यांनी दिली. तसेच आॅनलाईन नोंदणीसंदर्भातील प्रक्रिया रद्द करण्यासाठी बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
फोटो ओळी
२३०९२०२१-आयसीएच-०६
यंत्रमागधारकांच्या समस्येसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी शिष्टमंडळासोबत मंत्री अस्लम शेख यांची भेट घेतली.