लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणातंर्गत नाईट लँडिंगला केंद्रीय उड्डाण संचलनालयाने मान्यता दिली आहे, पण अजूनही भूसंपादनासंबंधीच्या परवानग्या व कागदपत्रे शासनाकडून मिळालेल्या नसल्याने काम पुढे जाऊ शकत नाहीत. ती द्यावीत यासाठी लवकरच जिल्हाधिकारीसह सर्व संबंधित शासकीय कार्यालयांशी बैठक घेऊ, असा निर्णय खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या विमानतळ प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण व नाईट लँडिंग सुविधांबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणचे चेअरमन अरविंद सिंह, मेंबर ऑफ ऑपरेशन आय. एन. मूर्ती व नागरी विमान उड्डाण संचलनालयाचे चेअरमन अरुणकुमार यांच्यासमवेत नुकतीच दिल्ली येथे खासदार संभाजीराजे यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगसाठी उड्डाण संचलनालयाची तत्वत्त: मान्यता आहे. मात्र राज्य शासनाकडून परवानगी व भूसंपादनाबाबतच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता झालेली नाही. हे झाल्याशिवाय पुढील कोणतीही कार्यवाही करता येत नाही, असे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया, सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. यात विमानतळ विस्तारीकरणाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणींचे तातडीने निवारण करून विस्तारीकरणाचे काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. विमानतळ विस्तारीकरण समितीने बैठक घेऊन सरकारने या बाबींची पूर्तता करावी यासाठी शासकीय कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे ठरले.
फोटो: ०८०१२०२१-कोल-विमानतळ
फोटो ओळ: कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाच्या संदर्भात असलेल्या अडथळ्यांसंबंधी खासदार संभाजीराजे यांनी संचालक कमलकुमार कटारिया, सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतीत बैठक घेतली.