कोल्हापूर : महानगरपालिकेची हद्दवाढ रखडल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे हद्दवाढी संदर्भात मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घ्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोल्हापूर महानगरपालिका सर्वात लहान क्षेत्रफळ असणारी एकमेव महानगरपालिका आहे. महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी ही कित्येक वर्षांची मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने झाली आहेत. मी सन २०१६ मध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर आमरण उपोषण केले. त्यावेळी काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे प्राधिकरण मंजूर करण्यात आले. परंतु, प्राधिकरणाचे काम पूर्णत: ठप्प असल्याने शहराचा विकास खुंटला आहे, यासह नागरिकांसमोर बांधकाम परवान्या सारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वास्तविक पाहता शहराची हद्दवाढ ही विकासाच्या दृष्टीने नैसर्गिक प्रक्रिया आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक या शहरांची हद्दवाढ अनेकवेळा झाल्याने ही शहरे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. पुणे महानगरपालिकेची तब्बल १२ वेळा हद्दवाढ करण्यात आली आहे. परंतु कोल्हापूर शहर हद्दवाढीअभावी भकास होत चालले आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
शहराची हद्दवाढ झाली तर नक्कीच महानगरपालिकेचे आर्थिक उत्पनात वाढ होऊन शहराचा विकास साधता येणार आहे. यासह केंद्र व राज्य शासनाच्या लोकसंखेच्या आधारावरील सर्व विकासकामांना निधी मिळू शकणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनास दिल्या होत्या. यावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याचा आढावा घेण्याकरिता मंत्रालय स्तरावर संबधित सर्व अधिकारी यांचे समवेत तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.