आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २३ : कमिशन वाढीच्या मागणीसाठी फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन आणि सीआयडीपीने दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरूवात दि. १४ मे पासून करण्याचे असोसिएशनने ठरविले आहे. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मुंबईत दि. २८ एप्रिलला शासन, असोसिएशन आणि तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली.
पेट्रोल-डिझेलच्या कमिशनच्या अनुषंगाने सन २०११ मध्ये केंद्र सरकारने तोडगा काढला होता. यात वर्षातून दोनवेळा कमिशन वाढविण्याचे ठरविले होते. यानंतरही कमिशनबाबत तेल कंपन्या आणि सरकार यांच्यात अनेकदा बैठकी झाल्या. मात्र, प्रत्यक्षात कमिशन काही वाढलेले नाही. त्यामुळे फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन आणि सीआयडीपीने दि. १४ मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासन पातळीवर असोसिएशनच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे.
या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला, तर ठीक अन्यथा दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय कायम करण्यात येईल. शिवाय दि. १५ मेपासून दिवसभर पंप सुरू आणि रात्री बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मुंबईमध्ये दि. २८ एप्रिलला शासन,असोसिएशन आणि तेल कंपन्यांचे प्रतिनिधींची बैठक होणार आहे, माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली. (प्रतिनिधी)कमिशन वाढीबाबत सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने पेट्रोल पंप चालकांनी असोसिएशनच्या निर्णयानुसार पंप बंद ठेवण्याची तयारी केली आहे. पेट्रोल पंपांबाबत सरकारची सध्याची धोरणे त्रासदायक ठरणारी आहेत. त्याचा फेरविचार होणे आवश्यक आहे. घरपोच पेट्रोल, डिझेल देण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केली आहे. मात्र, ते शक्य नाही.-अमोल कोरगांवकर, माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन