इचलकरंजी : शहरास काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याची ६५० कोटी रुपयांची योजना, आयजीएम रुग्णालयाचे आधुनिकीकरण व अतिदक्षता विभागासह ३५० खाटांचे रुग्णालय चालू करणे, झोपडपट्टी पुनर्वसन, शहर विकास आराखडा, आदी महत्त्वाच्या विषयांवर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी येथील नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक २७ मार्चला मंत्रालयात आयोजित केली आहे.शहरवासीयांना विविध नागरी सेवा-सुविधा पुरविणाऱ्या विविध योजनांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यापैकी शहरास स्वच्छ व मुबलक पाणी पुरविणाऱ्या काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणणारा ६५० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य व केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. आगामी तीन वर्षांत शहराचा होणारा विकास व वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरविणारी ही योजना आहे. या योजनेचा बोजा इचलकरंजीवासीयांवर पडण्याऐवजी केंद्र व राज्य सरकारच्या १०० टक्के अर्थसहाय्यावर ‘कळम्मावाडी’ योजना कार्यान्वित व्हावी, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर प्रयत्नशील आहेत.नगरपालिकेकडे आयजीएम इस्पितळ असून, या रुग्णालयात सध्या २०० खाटांचा दवाखाना सुरू असला तरी आर्थिक कमतरतेमुळे दवाखान्याकडे जीवनावश्यक असणाऱ्या सेवा व सुविधा उपलब्ध होत नाहीत. परिणामी, ३५० खाटांची सुविधा असणाऱ्या या इमारतीमध्ये पूर्ण क्षमतेने दवाखाना सुरू होण्याबरोबरच अतिदक्षता विभाग चालू करण्याचा सुमारे ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे. आमदार हाळवणकर यांच्या विशेष सूचनेवरून तयार करण्यात आलेला हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.तसेच सन २०४५ पर्यंत शहराची वाढणारी लोकसंख्या व उद्योगधंदे यासाठी नगरपालिकेने द्यावयाच्या सेवा-सुविधा, हद्दवाढ, आदी सुमारे ३८ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास अंतिम स्वरुप देऊन त्याप्रमाणे शासनामार्फत शहराचा विकास साधणे, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी घरकुल योजना, तसेच विशेष निधीतून देण्यात येणाऱ्या नागरी सुविधा याकडे शुक्रवारच्या बैठकीत सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या बैठकीसाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार, विविध विभागांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबरोबर बैठक आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार उपस्थित राहणार.
इचलकरंजीतील समस्यांवर आज बैठक
By admin | Published: March 25, 2015 9:18 PM