कोल्हापूर : सीपीआरमध्ये कोरोना रुग्ण आणि संशयितांसाठी बेड वाढविण्याची गरज असून याबाबत आता आज, गुरुवारी विभागप्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी ही माहिती दिली.
सध्या कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांसाठी सीपीआरमध्ये १७५ बेड उपलब्ध आहेत. मात्र मंगळवारी रात्रीपर्यंत यातील १६९ बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे नजीकच्या काळात तातडीने ही व्यवस्था करणे आवश्यक आहे. बुधवारीच ही बैठक होणार होती; परंतु वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची व्हीसीद्वारे बैठक लागल्याने आता गुरुवारी याबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.