कोल्हापूर : येथील विमानतळाच्या नाइट लॅडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग, आदींबाबतच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्यासाठी शनिवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. विमानतळावरील या बैठकीस लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षभरापासून विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत विविध कामे सध्या सुरू आहेत. त्यामध्ये धावपट्टीचे विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग, संरक्षक भिंत आदी कामांचा समावेश आहे. त्याचा आढावा घेण्यासह नाइट लॅडिंगबाबत राज्य शासनाकडून करावयाच्या पायाभूत सुविधांच्या पूर्ततेमधील अडचणी, प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी विमानतळावर बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत काही निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीस खासदार संभाजीराजे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील आणि जिल्हाधिकारी कार्यालय, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिकारी, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाइल नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. ती सोडविण्यासाठी मोबाईल सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची दुपारी १२.३० वाजता विमानतळ येथे बैठक होणार आहे.
प्रतिक्रिया
काही पायाभूत सुविधांची पूर्तता झाली नसल्याने नाइट लॅडिंगचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाकडून परवाना मिळत नसल्याचे वास्तव आहे. या पायाभूत सुविधांची पूर्तता लवकर करण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल.
-खासदार संभाजीराजे
विमानतळ विस्तारीकरणातील विविध कामांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. स्थानिक पातळीवरील कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या जाणार आहेत.
-खासदार संजय मंडलिक