(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पॉपलीन कापड खरेदी करणारे अडते व्यापारी रविवारच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. याचा जाब विचारण्यासाठी काही यंत्रमागधारक पॉवरलूम क्लॉथ मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळी जोरदार वादावादी होऊन सागर चाळके व गांधी हे एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मागील आठवड्यात मलमल कापड वापरणे, सुताचे भाव कमी झाल्याचा खोटा मेसेज पाठविला होता. याचा परिणाम कापडाचे भाव उतरण्यात झाला. याचा जाब विचारण्यासाठी कारखानदार त्या व्यापाऱ्याच्या पिढीवर गेले होते. त्यावेळी गांधी यांनी मध्यस्थी करीत रविवारी बैठक घेऊन ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
रविवारी सकाळी काही यंत्रमागधारक पॉवरलूम क्लॉथ मर्चंटस् असोसिएशनच्या दारात आले असता त्यांना तेथे कुलूप लावल्याचे आढळून आले. चाळके यांनी गांधी यांना दूरध्वनीवरून विचारणा केली, तेव्हा त्यांनी कापड व्यापारी आपले ऐकत नाहीत, असे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेले यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी गांधी यांच्या निवासस्थानी गेले. तेथे गांधी यांना तुम्ही शब्द पाळला नाही. अध्यक्षपदावर कशाला राहता, असा जाब विचारत प्रश्नांचा भडिमार केला. चाळके हे गांधी यांच्या अंगावर धावून गेल्याने वाद वाढत चालला होता. अखेर उपस्थितांनी दोघांना शांत केले. येथून पुढे गांधी यांनी या व्यवसायाच्या समस्यांबाबत कोणतीही मध्यस्थीची भूमिका घेऊ नये, असा इशारा दिला. यंत्रमागधारकांनी आजपासून सुताच्या भावानुसार दर काढून कापड विक्री करावी, असे ठरले. तसेच जुने कापड आजच्या नव्या दरानुसार विक्री करण्यासाठी यंत्रमागधारकांची बैठक बोलवण्याचे चाळके यांनी स्पष्ट केले. यावेळी कैश बागवान, आयुब जमखाने, आयुब गजबरवाडी, जितेंद्र चोपडे, दिलीप ढोकळे, आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी) १७०१२०२१-आयसीएच-०१
यंत्रमागधारक पॉवरलूम क्लॉथ मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी व सागर चाळके यांच्यात जोरदार वादावादी झाली.