मराठा आरक्षण, हद्दवाढ प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उद्या बैठक!
By भारत चव्हाण | Published: August 13, 2023 07:26 PM2023-08-13T19:26:55+5:302023-08-13T19:28:42+5:30
जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आल्याचे बाबा इंदूलकर यांनी सांगितले.
कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीच्या अनुषंगाने सकल मराठा, सर्व पक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता चर्चा करणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आल्याचे बाबा इंदूलकर यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभ होत आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी मराठा आरक्षण, कोल्हापूर शहराची हद्दवाढ तसेच महानगरपालिका प्रशासक नियुक्ती या तीन मुद्द्यांवर चर्चा करण्याकरिता वेळ द्यावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनामार्फत पवार यांच्याकडे करण्यात आली होती.
त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी कृती समिती व सकल मराठा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सकाळी सव्वादहा वाजताची वेळ दिली आहे. पवार यांच्या कार्यालयाकडील बैठकीचा निरोप जिल्हा प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना कळविला आहे. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीच्या विषयाला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता आहे.