कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीसंदर्भात आज, शनिवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. कॉमन मॅन तसेच प्रजासत्ताक संघटनेने पालकमंत्री केसरकर यांच्याकडे वेळ मागितली होती, त्यानुसार त्यांनी याविषयीच्या चर्चेसाठी वीस मिनिटे वेळ दिला आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. नुसत्याच बैठका, चर्चा होताच पण निर्णय मात्र काहीच होत नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सर्व पक्षीय शिष्टमंडळ भेटले तेव्हा, तुम्ही ग्रामीण व शहरी यांच्यात एकमत घडवून आणा मी एक मिनिटात शहराची हद्दवाढ करतो असे सांगितले होते. पाटील यांनी एकमत करण्याची जबाबदारी हद्दवाढविरोधी आणि समर्थक यांच्यावरच सोपविल्याने त्यांची हद्दवाढ करण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट झाले होते.जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शहराच्या हद्दवाढीसाठी चर्चेची विनंती काॅमन मॅनचे बाबा इंदूलकर व प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी केली होती. आज, शनिवारी केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत नियोजन मंडळाची बैठक होत आहे. या दरम्यान वीस मिनिटे केसरकर यांनी इंदूलकर व देसाई यांना चर्चेसाठी वीस मिनिटांचा वेळ दिला आहे.
कोल्हापूर शहर हद्दवाढीचा मार्ग मोकळा?, पालकमंत्र्यांसमवेत आज महत्वपूर्ण बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:44 AM