लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने विद्यमान संचालकांसह इच्छुकांनी ठरावधारकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तालुकानिहाय यंत्रणा सक्रिय झाली असून, संचालकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसह विश्वासू कर्मचारी या माेहिमेवर पाठविण्यात आले आहेत.
‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवर आज, सोमवारपर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर सुनावणी पूर्ण करून १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार असल्याने संचालकांनी संपर्क मोहीम राबविली आहे. निवडणुकीसाठी ३६५९ ठरावधारक आहेत. मतदारांची संख्या कमी असली तरी निवडणूक अटीतटीची होणार आहे. पॅनेल टू पॅनेल मतांची संख्या खूप कमी राहणार असून व्यक्ती बघूनच शिक्का पडणार आहे. मागील निवडणुकीत मतदारांनी वेचून मतदान केल्याने सत्तारूढ गटाला घाम फुटला होता. यावेळची परिस्थिती काहीशी वेगळी असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक हे एकत्र आहेत. त्यामुळे विरोधकांची ताकद वाढली आहे.
दुरंगी लढत होणार हे निश्चित असल्याने विद्यमान संचालक मंडळासह इच्छुकांनी जोर-बैठका मारण्यास सुरू केले आहे. मागील निवडणुकीत स्वर्गीय चंद्रकांत बोंद्रे यांनी निवडणुकीची वाट न पाहता संपर्क मोहीम राबवल्याने मोठ्या फरकाने ते विजयी झाले. ठरावधारकांपर्यंत पोहोचल्यानंतर सिंगल मत मिळू शकते, त्यामुळे ठरावधारकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. संचालकांच्या विश्वासातील कर्मचाऱ्यांवर ‘विशेष’ जबाबदारी दिली आहे.
सतेज पाटील आजपासून सक्रिय
पालकमंत्री सतेज पाटील हे हॉस्पिटलमध्ये असल्याने ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊनही फारशा हालचाली दिसत नाहीत. आज, सोमवारपासून ते सक्रिय होणार असल्याने ‘गोकुळ’चे दूध तापण्यास सुरुवात होणार आहे.
बिनविरेाधची नुसतीच हवा
‘गोकुळ’ बिनविराेध करण्यासाठी सत्तारूढ गटाचे मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पक्षीय पातळीवरून दबावाचे राजकारणही होऊ शकते. मात्र, येथे एकमेकांच्या अलर्जीचा प्रश्न असल्याने बिनविरोधची चर्चा ही नुसती हवाच ठरेल.