दत्ता लोकरेसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रादेशिक सहसंचालक निवडणूक विभागाकडे ३ मार्चला निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये भरले. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार हे निश्चित झाले. कार्यक्षेत्रात आघाडी आकारण्यासाठी नेतेमंडळींच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक गावे ही राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील येत असल्याने विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय गणिताची बेरीज बांधली जात आहे.मागील निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, के. पी. पाटील, समरजित घाटगे यांची समविचारी आघाडी आकारास आली. त्यांनी सर्व २१ जागा जिंकल्या. विरोधी आघाडीचे नेतृत्व आमदार प्रकाश आबिटकर, दिनकरराव जाधव, संजयबाबा घाटगे, विजयसिंह मोरे यांनी केले.
चांगल्या साखर कारखान्यात राजकारण नको, या उद्देशाने मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे एकाच व्यासपीठावर आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशी लढत झाली. यावेळी बिद्रीबरोबरच शेजारील भोगावती आणि हमीदवाडा कारखान्याच्या निवडणुकाही होत आहेत. तेथील राजकीय संदर्भ जोडले जाण्याची शक्यता आहे.बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आतापर्यंत जिल्ह्यात ऊसदर देण्यास आघाडी घेतली आहे. साखर कारखाना उत्तम चालवला आहे. प्रकल्प उभारून यशस्वी केले आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे यांची आघाडी आकारात येत असून, ए. वाय. पाटील हेही याच आघाडीत असतील, असे ठामपणे सांगितले जात आहे.गतवर्षी विरोधात असलेले बिद्रीचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव व विजयसिंह मोरे हे या आघाडीत असतील. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नव्या राजकीय घडामोडीनुसार विरोधात राहतील. त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर, मंत्री पाटील, समरजित घाटगे अशी आघाडी होईल. सत्ताधारी गटातील नाराज मंडळी ही विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याने तुल्यबळ आघाडी होण्याची चिन्हे आहेत.
समरजित घाटगे गटात दोन मतप्रवाहस्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी गेली २५ वर्षे के. पी. पाटील यांच्याबरोबर बिद्रीच्या निवडणुकीत आघाडी केली. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांच्यासोबतच आघाडी करावी, असा घाटगे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला मुश्रीफ यांच्याबरोबर लढावे लागणार असल्याने शिंदे शिवसेना आणि भाजप अशी आघाडी करत बिद्रीची निवडणूक लढवावी, असाही मतप्रवाह कार्यकर्त्यांत आहे.
भाजपचे कार्यकर्ते के. पी. यांच्या प्रेमात..राधानगरी, भुदरगड या दोन्ही तालुक्यांतील भाजपच्या कार्यकर्त्यांचे सत्ताधारी के. पी. पाटील आघाडीबरोबरच संधान असल्याने ते त्यांच्याबरोबर असतील असे चित्र आहे. असे झाल्यास दोन्ही आघाड्यांतील फलकांवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि विक्रमसिंह घाटगे यांचे फोटो झळकतील असे चित्र आहे.