कोल्हापूर : इतिहासातील स्त्री समाजसुधारकांनी केलेल्या संघर्षातूवन स्त्रीमुक्तीची वाटचाल सुरू आहे, महिला आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. स्त्री सन्मानाचा हा संघर्ष अजूनही सुरू असताना काळाची पावलं पुन्हा हिंदू राष्ट्र, सनातनी प्रवृत्ती, धर्म-राजकारण आणि स्त्री दमनाच्या प्रतीगामी दिशेने पडत आहेत. या स्फोटक परिस्थितीत क्रांतीकारकांच्या विचारांचा हात हातात घेवून आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्यादृष्टीने स्त्री समाजसुधारक हे पुस्तक विचारांची डायरी आहे असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी मंगळवारी केले.शाहू स्मारक भवनच्या मिनी हॉलमध्ये सांगलीच्या संग्राम संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात स्त्री समाजसुधारक या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यवाह मीना सेशु होत्या. यावेळी लोकमतचे संपादक वसंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते धनाजी गुरव, प्रशांत नागावकर, युवराज जाधव उपस्थित होते.मेघा पानसरे म्हणाल्या, जाती आणि धर्माच्या उतरंडीच्या काळात बसवण्णा, शिवाजी महाराज, शाहु महाराज, फुले, आंबेडकर अशा समाजधुरिणांनी स्त्रीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. पण महिलांचा संघर्ष आजच्या २१ व्या शतकातही सुरू आहे. महान संस्कृतीच्या नावाखाली हिंदू राष्ट्राची पायाभरणी सुरु आहे.
संविधानाच्या ज्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांवर देश जिवंत आहे, ज्यामुळे आपण सनातन्यांना प्रश्न विचारू शकतो ते स्वातंत्र्य गमावण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यांच्याशी संघर्ष करून आपले दु:ख नाहीसे करण्यासाठी आपण हातात हात घालून पुढे जावू या.मीना सेशू म्हणाल्या, संवेदनशिलता आणि प्रामाणिकता ही स्त्रीची शक्ती आहे. निसर्गाने मानवाच्या मेंदूची रचना करताना स्त्री-पुरुष असा भेद केलेला नाही. आपण मात्र अजूनही जातीभेद आणि लिंगभेद करून माणसाचं डोकं भ्रष्ट करतोय.
पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक पद्धतीने स्त्रीला दुय्यम स्थान दिले आहे. आम्ही हे सनातनी विचार बदलू, पुढचं पाऊल टाकत नव्या विचारांच्या समाजाची निर्मिती करू त्यासाठी ही पुस्तिका दिशादर्शक ठरेल.धनाजी गुरव यांनी जाती व्यवस्था आणि मनुस्मृतीने स्त्रीच्या आयुष्यात दुख निर्माण केले आहे. त्या दुखाची कारणमिमांसा आणि येणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची नवी दृष्टी स्त्री समाजसुधारक पुस्तिकेतून मिळते असे मत व्यक्त केले.यावेळी सुधा पाटील या तृतीयपंथीयाने त्यांना समाजाकडून मिळत असलेल्या वागणुकीचे वास्तव मांडले. प्रशांत नागावकर, युवराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. किरण देशमुख यांनी सुत्रसंचलन केले. संगिता भिंगारदिवे यांनी आभार मानले.