गडहिंग्लज : रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात शासनाने निधी दिला आहे. परंतु, ग्रामपंचायतीला पूर्वसूचना न देता ठेकेदारांकडून कामे परस्पर पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे दर्जाहीन कामे होत आहेत. विकास निधी हा ठेकेदारांना पोसण्यासाठी आहे का ? असा सवाल पं. स. सदस्य विठ्ठल पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी झाली.
यावेळी सदस्या बनश्री चौगुले यांनी पाटील यांच्या विधानाला आक्षेप घेतला. विकास निधी विकासासाठी दिला आहे. ठेकेदारांना पोसण्यासाठी नाही. आपण चुकीचे विधान करत आहात यावर पाटील यांनी आपण ठेकेदारांची बाजू घेऊ नका. तुम्ही स्वत: ठेकेदार आहात का? ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी भरपूर निधी दिला आहे. त्यांचे अभिनंदन करतो. पण, ठेकेदारांनी मनमानी करून निधीचा अपव्यय करू नये. कौलगेतील रस्त्याचे काम दर्जाहीन झाले आहे. अत्याळमधील रस्त्याचे काम पूर्ण झाले. पण, संबंधित अधिकाऱ्यांना कामाची माहिती नाही. त्याबाबत चौकशी करण्याची सूचना प्रकाश पाटील यांनी केली. दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाका. दुंडगे-हसूरचंपू रस्त्याच्या कामाची सर्व माहिती द्यावी, अशी सूचना जयश्री तेली यांनी केली.
हरळी कारखान्यातून मळी मिश्रित पाणी हिरण्यकेशी नदीत सोडल्यामुळे पाणी दूषित बनून माशांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात साखर कारखाना आणि हरळी ग्रामपंचायतीला नोटिसा द्या, अशा सूचना सभापती रूपाली कांबळे यांनी दिल्या.
मुगळी आयुर्वेदिक दवाखान्याकडे गेली वर्षभर औषधांचा पुरवठा झालेला नाही. चन्नेकुप्पी दवाखान्यात केवळ फार्मासिस्ट आहेत. त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी श्रीया कोणकेरी यांनी केली.
यावेळी जि. प. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी माध्यमिक शिक्षकांच्या कामाबाबत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी बड्याचीवाडी माध्यमिक शाळेलाही भेट दिली.
यावेळी उपसभापती इराप्पा हासुरी, इंदुमती नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.
------------------------------------
* तहसील कार्यालयाची दादागिरी
उत्खनन व रॉयल्टी न भरलेल्या कारणावरून २०१९ मधील नोटिसा आता पाठवून शेतकऱ्यांना उताऱ्यावर बोजा नोंदविण्याची धमकी दिली जात आहे. तहसील कार्यालय दोन वर्षानंतर नोटीस देत आहे. या अगोदर कार्यालय झोपले होते का? तहसील कार्यालय शेतकऱ्यांवर दादागिरी करत आहे, असा आरोप विठ्ठल पाटील यांनी केला.
------------------------------------
* शेतकऱ्यांचा सन्मान जि. प. भात पीक स्पर्धेत कृष्णा दादू पाटील (भडगाव) व सूर्यकांत नारायण (तळेवाडी) यांनी भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल पंचायत समितीतर्फे सत्कार झाला.