संदीप बावचे : शिरोळ : शिरोळचा दत्त सहकारी साखर कारखाना राज्यात आदर्श मानला जातो. सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती झालेल्या या कारखान्याकडून आता दैनंदिन ११ हजार मेट्रिक टन ऊस गाळप होणार आहे. विस्तारीकरणाला सभासदांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील मोठी गाळप क्षमता असणारा हा एकमेव कारखाना बनणार आहे. स्व. सा. रे. पाटील यांच्यानंतर दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी ऊस विकास योजनेबरोबरच क्षारपडमुक्त शेती प्रकल्प राबवून कारखाना कार्यक्षेत्र विकासाला हातभार लावला आहे. सन १९६९ साली कारखान्याची स्थापना झाली. त्यानंतर १९७१-७२ साली १२५० मेट्रिक टन गाळपाने कारखान्याचा हंगाम सुरू झाला. १९७८ साली २ हजार, १९८१ ला अडीच हजार, १९८९ ला ५ हजार, २००० ला साडेसहा हजार; तर २००२ ला ७ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असे नूतनीकरण करण्यात आले होते. सध्या हा कारखाना ९ हजार मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळप करीत आहे. ऊस विकास योजनेतून नोंद होणाऱ्या ऊसक्षेत्रानुसार अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊसगाळपासाठी उपलब्ध होऊ शकतो. शिवाय, ‘दत्त’ने क्षारपडमुक्तीचा पॅटर्न राबविल्यामुळे २२५० एकर जमीन पिकाखाली आली आहे. या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी ऊस पिके घेण्यास सुरुवात केल्यामुळे ३ ते ४ लाख मेट्रिक टन जादा ऊस उपलब्ध होणार आहे. एकूण उपलब्ध होणाऱ्या उसामुळे कारखान्याकडे अठरा लाख मेट्रिक टन इतका ऊस गाळपास उपलब्ध होऊ शकतो. व्यवस्थापनाच्या आवाहनानंतरच गाळप क्षमतेच्या विस्तारीकरणाबरोबरच डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पास सभासदांनी मंजुरी दिली आहे.
चौकट -
‘दत्त’ची वाटचाल ३२ हजार ६३६ कारखान्यांचे सभासद असून साडेअकराशे कर्मचारी आहेत. उपपदार्थांतून डिस्टिलरी व इथेनॉलची निर्मिती होते; तर को-जनरेशनच्या माध्यमातून ३६ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प राबविला जात आहे. सेंद्रिय ऊसशेतीचा प्रयोग राबवून सेंद्रिय साखरनिर्मितीही कारखान्याने केली आहे. कारखान्याच्या प्रगतीत व्यवस्थापनासह कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व सभासदांचे योगदान आहे.
कोट - ५० वर्षांच्या वाटचालीत शेतकरी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावरच ‘दत्त’ने आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे. हे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठीच ‘दत्त’ने वाटचाल सुरू ठेवली आहे.
- गणपतराव पाटील, अध्यक्ष
फोटो - २००३२०२१-जेएवाय-०१-शिरोळ येथील दत्त साखर कारखाना, ०२-गणपतराव पाटील