लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्तीच्या विकासासाठी ३६ कोटी ३० लाख रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे. दरम्यान, या निधीचे वाटप नीट व्हावे अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी अनेक सदस्यांनी सोमवारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांची भेट घेतली.
गेल्यावर्षीच्या दलित वस्ती निधीच्या वाटपावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचा अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, निधीचे वितरण होऊन कामेही सुरू झाली आहेत. आता यासाठी कोरोनाच्या पाश्वंभूमीवर घातलेली बंधने शासनाने काढून टाकली आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषदेला हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधीतून सन २०१८/१९ ते सन २०२२/२३ या कालावधीसाठी जो बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातीलच विकासकामे घ्यावी लागणार आहेत.
गेल्यावेळच्या वाटपाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली गेल्याने अनेक सदस्यांनी घाटे यांची भेट घेऊन योग्य निधी वाटपाबाबत चर्चा केली. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सुभाष सातपुते, विशांत महापुरे, सदस्य पती राहुल देसाई, सरदार मिसाळ, शेंडुरे यांचा समावेश होता.