कोल्हापूर : जगात कोणतीही चांगली वाईट घटना घडली की त्या घटनेचे रसरशीत विश्लेषण तत्काळ कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत होतेच. कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीचा ताजा संदर्भ त्याला असतो. याला अमेरिकेचे राजकारणही अपवाद ठरले नाही. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. यात भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव झाला. याच दरम्यान कोल्हापूर उत्तरमधील अर्ज माघारीच्या प्रकरणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे ‘दम नव्हता तर उभे राहायचे नव्हते ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद’ हे विधान राज्यभर गाजले. हाच संदर्भ घेत राज्यभरातील नेटकऱ्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या तोंडी ‘दम नव्हता तर उभारायचे नव्हतं ना मग’ हे वाक्य घालत यावर मीम्स बनवल्या. या मीम्सनी बुधवारी सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफार्मवर अक्षरश: धुमाकूळ घातला. कमला हॅरिस आणि ज्यो बायडेन हे एकाच पक्षातील आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत हॅरिस यांचा पराभव झाला. नेटकऱ्यांनी मात्र, बायडेन यांचा फोटो लावत 'दम नव्हता तर उभारायचे नव्हते ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद’ अशा मीम्स बनवून धुमाकूळ घातला.
अमेरिकेत हॅरिस यांचा पराभव, त्यात कोल्हापूर उत्तरचे पडसाद; सतेज पाटील यांच्या विधानांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 1:35 PM