प्रदीप शिंदे - कोल्हापूर -‘दिवे लागणीची वेळ झाली. खेळ पुरे, घरात या...’, ही हाक काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरातून सर्रास ऐकू यायची, घरापुढील अंगणही नाहीसे झाले...आणि अंगणातील अनेक खेळ नुसते आठवणीतच उरले आहेत. आधुनिकतेमुळे पारंपरिक खेळ बंद पडले आणि नवीन खेळ आले. जुने खेळ फक्त आता गोष्टींत किंवा लिहिण्यापुरते उरले आहेत. हेच पारंपरिक खेळ टिकून राहावेत व त्याबाबत येणाऱ्या भावी पिढीला माहीत व्हावे या उद्देशाने कोल्हापुरातील तपोवन मैदानावर तीन दिवस ‘आठवणीतल्या खेळांची शाळा’ भरणार आहे. पूर्वी दुपारी गल्ली-बोळांत मुले गोट्या, कानढोपरी, टायर पळविणे, डबा एक्स्प्रेस, विटी-दांडू, भोवरा, जिबली असे खेळ असताना परिसरातीलच वृद्धांच्या आरोळीने त्यांच्यावर वचक राहायची. हे चित्र ग्रामीण भागासह शहरातही हमखास पाहायला मिळायचे. मात्र, आता मोबाईलसह बदलत्या तंत्रज्ञानामुळे गल्लीतील पारंपरिक खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे गल्लो-गल्लीतील पळापळी, विटी-दांडू, लगोरी अशा खेळांमुळे निर्माण होणारा किलबिलाट नाहीसा झाला आहे. लहान मुलांना आता टेक्नोसेव्ही गेमचे वेड लागले आहे. त्यामुळे विटीदांडूची जागा स्मार्ट फोनमधील गेमने घेतली आहे. या गेममुळे बुद्धीला चालना मिळत असली तरी डोक्याने स्मार्ट होणारी मुलं स्वत:च्या घरापासून दूर जात आहेत. टेक्नेसॅव्ही गेम्समुळे लहान मुले एकत्र येऊन खेळले जाणारे खेळ दिसेनासे झाले आहेत. शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे मधल्या सुटीतील मैदानी खेळाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. हेच पारंपरिक खेळ टिकविण्यासाठी ‘चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ अंतर्गत’ या उपक्रमातील सागर वासुदेवन, सचिन जिल्हेदार, मिलिंद यादव यांच्यातर्फे पुढाकार घेऊन ‘आठवणीतील खेळाची शाळा’ भरविण्यात येणार आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढतो...मोबाईल व संगणक गेम्समुळे लहान मुले मानसिक आजारांना सामोरे जात आहेत. ते मोठे झाल्यानंतर मोठ्या संकटांना सामोरे जाताना डगमगतात. पारंपरिक खेळांत नेतृत्व करण्याची, प्रतिस्पर्धांवर डाव टाकण्यासाठी डावपेच आखणे, या बारीक-सारीक सर्व काही गोष्टी शिकण्यासाठी मिळतात. त्याचबरोबर या अन्य मुलांसोबत ओळख होते. त्यामुळे हे खेळ खेळणे गरजेचे आहे.पालकांनी मुलांना मोबाईलवेडे न बनविता मैदानी खेळ खेळायला पाठविले पाहिजे. - सागर वासुदेवन अशी भरणार आठवणीतील शाळा....‘चिल्लर पार्टी’च्यावतीने या पारंपरिक खेळांचे दि. २८ ते ३० आॅक्टोबरदरम्यान सकाळी ९ ते १२ या वेळेत तपोवन मैदानावर ‘आठवणीतल्या खेळांच्या ओळखी’चे आयोजन केले आहे. हे खेळ सर्वांसाठी मोफत असून, यामध्ये गोट्या, कानढोपरी, सुरपारंब्या, टायर पळविणे, रूमाल पळविणे, डबा एक्स्प्रेस, विटीदांडू, भोवरा, बिट्ट्या, आबाधोबी मिळावा हे खेळ या ठिकाणी खेळले जाणार आहे. या ठिकाणी पालकांनी मुलांना खेळण्यासाठी सोडावे, असे आवाहन चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे केले आहे.
आठवणीतील खेळांची होणार उजळणी
By admin | Published: October 28, 2014 12:51 AM