कोल्हापूर : वैयक्तिक दु:खांचा विचार न करता, आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने शुक्रवारी राजारामपुरीतील स्मारकास कायमस्वरूपी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण करण्यात आले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून या स्मारकाच्या सुशोभीकरणास अडीच लाखांचा निधी मंजूर झाला होता. सुशोभीकरणानंतर स्मारक आणि परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे.अण्णा भाऊंची आज, शनिवारी जयंती होत आहे. सर्वच जातिधर्मांच्या लोकांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्यवाचनातून अनेकांना जगण्याची दिशा मिळाली आहे. एकाच व्यक्तीची विविधांगी कामगिरी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशांतही शोधून सापडणार नाही. अशा या थोर कलावंताला जन्मशताब्दीनिमित्त क्षीरसागर यांनी आदरांजली वाहिली आहे.