कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून स्थापन झालेल्या ताराराणी विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेला विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. त्याचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले.राजारामपुरी येथील संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या मेळाव्यात १६०० हून अधिक माजी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यांनी पुन्हा एकदा त्या वेळच्या आठवणी जागविल्या. यात आंतरराष्ट्रीय टेनिसपटू शैलजा साळोखे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, बुद्धिबळपटू वंदना पोतदार, सामाजिक कार्यकर्त्या सरलाताई पाटील, मीना चंदावरकर, मेजर सुलोचना खानविलकर, पोलीस आयुक्त सुरेखा बागे, सामाजिक कार्यकर्त्या साधना झाडबुके, आदीं माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यासह माजी विद्यार्थिनींनी विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, कला, साहित्य, खेळ या क्षेत्रांत आपल्या विद्यार्थिनींनी आपला ठसा उमटविला आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना वसतिगृहासह परिसर सौरऊर्जेवर सुरू करायचा आहे. याकरिता ३.५ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. याकरिता माजी विद्यार्थिनींकडून मदतीची अपेक्षा आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश हिलगे, डॉ. एस. एन. पवार, सचिव प्राजक्त पाटील, विश्वस्त कांचन पाटील, डॉ. भारती शेळके, प्राचार्य डॉ. सी. आर. गोडसे, आदी उपस्थित होते. डॉ. नीता धुमाळ यांनी स्वागत, तर डॉ. सुजय पाटील यांनी आभार मानले.