कोल्हापूर : गोट्या...विटी-दांडू... खो-खो... पळापळी... धावरिंग... गलोरी... सूरपारंब्या... ढकलगाडी... टायर पळविणे... अशा पारंपरिक खेळांचा आनंद शुक्रवारी सकाळी आबालवृद्धांनी लुटला. निमित्त होत... कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमाचे.तपोवन मैदानावर आज, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता ही शाळा सुरू झाली. त्यामध्ये सहभागी झालेली मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आपल्याला आवडते पारंपरिक खेळ खेळायला सुरुवात केली. कोण विटी-दांडू खेळतोय, तर कोण ढकलगाडीवर बसून मैदानावर फेरफटका मारतोय...तर कोणी हातात धावरिंग घेऊन गोल रिंगण घालतोय...असे खेळ खेळता लहानांसोबत ज्येष्ठही लहान झाल्याचे दिसले. दुपारपर्यंत ही शाळा सुरू होती. सोबत आणलेली शिदोरी म्हणजे जेवणाचे डबे हे एकत्रितपणे सर्वांनी खाऊन एकत्र खेळासोबत एकत्र जेवण्याचाही मनसोक्त आनंद लुटला. दुपारपर्यंत सुरू असलेल्या या शाळेत कोल्हापूरसह सांगली, कऱ्हाड, सातारा येथील चारशेहून अधिकजण सहभागी झाले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. ही शाळा तीन दिवस सुरू राहणार असून, त्याचे संयोजन सागर वासुदेवन, सागर बकरे, सचिन जिल्हेदार यांनी केले आहे.गोट्या, सूरपारंब्या, टायर पळविणे, रस्सीखेच, रुमाल पळविणे, विटी-दांडू, भोवरा, खो-खो., ढकलगाडा, धावरिंग, आईचे पत्र हरविले, गलोरी, मातीची रास, असे अनेक पारंपरिक खेळ खेळून अबालवृद्धांनी आनंद लुटला.मोबाईलच्या जमान्यातया खेळांची गरजमोबाईल, व्हॉटस् अॅपच्या जमान्यात या पारंपरिक खेळांची गरज आहे; परंतु ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमातून या जुन्या मैदानी खेळांना एक व्यासपीठ देऊन लहान मुलांना हे खेळ खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळेल. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य व चांगला असल्याच्या प्रतिक्रिया आठवणीतल्या शाळेत सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या.आज मी लहान झालो...या शाळेत खेळायला आलेले जवाहरनगर येथील ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक मोहन आत्माराम शिरवडेकर यांनी मनसोक्त सर्व खेळ खेळले. हातात धावरिंग घेऊन ते एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने मैदानावर पळत होते. त्याबरोबरच विटी-दांडू, रस्सीखेच असे खेळ खेळून ते यामध्ये दोनवेळा जिंकलेही. आज माझ्या जुन्या आठवणी जाग्या होऊन या लहान मुलांमध्ये मीही लहान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.सध्या कॉम्प्युटर, मोबाईलच्या जमान्यात मुले पारंपरिक खेळ विसरली आहेत. त्यांना या खेळांची माहिती व्हावी, तसेच या मातीतील खेळांमुळे त्यांचा या मातीशी स्पर्श होऊन ही पिढी सुदृढ होण्यासाठी ‘आठवणीतील शाळे’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. या शाळेत सर्व मुले मनसोक्त आनंद लुटत असल्याचे समाधान होत आहे.- सागर वासुदेवन(आयोजक, आठवणीतील शाळा)
‘तपोवन’वर रंगले ‘आठवणीतील खेळ ’
By admin | Published: December 25, 2015 11:35 PM