छत्रपती शाहू महाराजांच्या आठवणी अमेरिकन वृत्तपत्रातून -
१) छत्रपती शाहू महाराज राजेपदी विराजमान
१८८४ साली श्रीमंत यशवंतराव आबासाहेब घाटगे यांचा कोल्हापूरच्या तख्तावर छत्रपती शाहू महाराज म्हणून दत्तकविधी पार पडला. यावेळी महाराजांचे वय सुमारे १० वर्षांचे होते. विद्यालयीन आणि राज्यकारभार यांचे शिक्षण पार पडल्यावर २ एप्रिल १८९४ रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या हाती प्रत्यक्ष कारभाराची सुत्रे देण्याचा समारंभ तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला. या प्रसंगाचं वर्णन करणारी सविस्तर बातमी ३ ऑगस्ट १८९४ रोजी अमेरिकन वृत्तपत्र The Wichita Eagle मध्ये छापून आलेली होती.
या बातमीचा सारांश याप्रमाणे - या प्रसंगाच्या निमित्ताने कोल्हापूर राज्यात अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. लांबलांबून प्रजाजन हा समारंभ बघायला आलेले होते. जागोजागी मोठमोठ्या कमानी उभारून, रोषणाई करून या समारंभाची तयारी केली गेलेली होती. मुंबईहून गव्हर्नर आणि त्यांचा लवाजमा येऊन कोल्हापुरात दाखल झाला आणि कार्यक्रमाची लगबग सुरू झाली. जिथं हा कार्यक्रम पार पडला तो नवीन राजवाड्यातला दरबार हॉल उत्तमरितीने शृंगारला गेला होता. भिंतीवर जागोजागी वेलबुट्टी काढली गेलेली होती आणि उंची दर्जाचे आरसे लावून त्याला शोभा आणली गेलेली होती. या कार्यक्रमासाठी या हॉलमध्ये एक विशेष व्यासपीठ तयार केलं गेलेलं होतं, ज्यावर महाराजांचे खास आसन ठेवलेले होते.
जसजशी समारंभाची वेळ जवळ येत होती तसा नव्या राजवाड्यासमोर जमलेल्या लोकांचा उत्साह वाढत चाललेला होता. अखेर नियोजित वेळेस गव्हर्नरचे आगमन झाले आणि समारंभाला सुरुवात झाली. या समारंभावेळी महाराजांनी लाल रंगाचा भरजरी पोशाख परिधान केला होता आणि त्याच रंगाची पगडीही त्यांनी परिधान केलेली होती. या पगडीला टपोऱ्या मोत्यांचा तुरा आणि शिरपेचाने अजूनच शोभा आलेली होती.
कार्यक्रमावेळी लेडी हॅरिस, इतर अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि मिशनरी स्त्रिया यांची बसण्याची व्यवस्था खाशा स्त्रियांबरोबर सज्जात केली गेलेली होती. सुमारे दोनशे दरबारी मानकरी आणि निमंत्रित यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात गव्हर्नरच्या भाषणाने झाली. नंतर त्या भाषणाचा पॉलिटिकल एजंटने मराठी अनुवाद वाचून दाखवला. गव्हर्नरच्या भाषणाला उद्देशून श्रीमंत छत्रपतींनी इंग्रजीतून भाषण केले आणि करवीर संस्थानच्या दिवाणांनी त्याचा मराठी अनुवाद वाचून दाखवला.
यानंतर गव्हर्नर महाराजांना राजाधिकार प्रदान केल्याचे प्रतीक म्हणून व्यासपीठावरच्या मानाच्या आसनावर बसवले आणि त्यांच्या सन्मानार्थ १९ तोफांची सलामी देण्यात आली.
महाराजांचे वर्णन करताना हे वृत्तपत्र म्हणते ‘नवीन राजा निमगोऱ्या वर्णाचा, उंच देखणा आणि अंगापिंडाने भक्कम आहे. राजाला घोडेस्वारी आणि बंदूकबाजीची अत्यंत आवड आहे. प्रजेत तो सहज मिसळतो आणि प्रजेचेही त्याच्यावर विशेष प्रेम आहे.’ '
हजारो मैलांवर कोल्हापुरात झालेल्या या समारंभाची दखल अमेरिकेत घेतली जाणे ही खरंतर नवलाईची आणि आपल्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट होय.
२) छत्रपती शाहू महाराजांना केम्ब्रिज विद्यापीठातर्फे मानाची पदवी - १९०१ साली इंग्लंडचा राजा सातवा एडवर्डच्या राज्यारोहण समारंभाला शाही पाहुणे म्हणून महाराजांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महाराजांना विशेष सन्मान म्हणून डी. लिटच्या तोडीची तेव्हाची ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही पदवी देण्यात आली. हा समारंभ १० जून १९०२ रोजी केम्ब्रिज येथे पार पडला. अमेरिकेतल्या ‘न्यूयॉर्क ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने त्याची दखल घेऊन ही बातमी छापलेली होती.
३) छत्रपती शाहू महाराजांची फ्लोरेन्स येथील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीला भेट - १९०१ साली इंग्लंडचा राजा सातवा एडवर्डच्या राज्यारोहण समारंभाला गेलेले असतानाच महाराजांनी युरोपमधल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. यात त्यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराजांच्या फ्लोरेन्स इथल्या समाधीचाही समावेश होता. तसं पाहायला गेलं तर ही भेट अतिशय खासगी स्वरूपाची किंवा वैयक्तिक स्वरूपाची म्हणता येईल, अशी होय. पण तरीही सॅनफ्रान्सिस्को इथल्या एका ‘इटालियन’ या इटालियन भाषेतल्या वृत्तपत्रानं या घटनेची दखल घेतली आणि १२ ऑगस्ट १९०२ सालच्या वृत्तपत्रात त्याबद्दलची बातमी छापून आलेली होती. मूळच्या इटालियन बातमीचा सारांश असा - कोल्हापूरच्या महाराजांचे काल येथे (फ्लोरेन्समध्ये) आगमन झाले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू (बापूसाहेब महाराज) आणि इतरही काही मंडळी आहेत. सकाळी त्यांनी काही महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली आणि दुपारी त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या १८७० साली उभारलेल्या या स्मारकाला भेट दिली. या समाधीपाशी आल्यावर त्यांनी आपापले जोडे उतरवले, समाधीला वंदन करून त्यावर पुष्पगुच्छ ठेवले आणि समाधीभोवती एक प्रदक्षिणा घातली.
४) छत्रपती शाहू महाराजांचे दुष्काळ निवारण - १८९७ साली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला. दुष्काळपीडित भागात करवीर संस्थानाचाही समावेश होता. छत्रपती शाहू महाराज यावेळी गादीवर येऊन जेमतेम तीन वर्षे झालेली होती. तरीही महाराजांनी स्वतः जातीने लक्ष घालून दुष्काळ निवारणाचे कार्य हाती घेतले आणि जनतेला दुष्काळाची झळ जाणवू दिली नाही. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खास लंडनहून आलेल्या समितीतील एका पत्रकाराने कोल्हापूरला येऊन महाराजांनी हाती घेतलेल्या कार्याची पाहणी केली आणि त्यासंदर्भात त्यांची मुलाखतही घेतली. महाराजांनी यावेळी त्या पत्रकाराला माहिती दिली की, साधारण दर पाच वर्षांनी अशी परिस्थिती उद्भवते त्यामुळं आम्ही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णतः सज्ज आहोत आणि या दुष्काळाच्या निवारणासाठी पाच लाख रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली आहे.
महाराजांच्या या जबाबदार आणि प्रजेप्रति तळमळ असणाऱ्या स्वभावाचे कौतुक या पत्रकाराने केले आणि यासंबंधीची बातमी ‘द इंडियाना पोलीस जर्नल’ नावाच्या अमेरिकन वृत्तपत्रात दिनांक २५ जानेवारी १८९७ रोजी छापून आलेली होती.
छत्रपती शाहू महाराजांबद्दलच्या अशाप्रकारच्या इतरही काही बातम्या या अमेरिकन वृत्तपत्रात आढळतात. पण त्यातल्याच काही निवडक बातम्या मी आपल्यापुढं मांडल्या. महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्याबद्दलच्या छोट्या घडामोडींचीही दखल सातासमुद्रापार अमेरिकेत घेतली जावी, आपले छत्रपती शाहू महाराज त्या काळातले एक ग्लोबल व्यक्तिमत्व होते ही खरंच आपल्या कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
यशोधन जोशी
लेखक मूळचे कोल्हापूरचे असून, पुणे येथे माहिती तंत्रज्ञान अभियंते म्हणून कार्यरत आहेत. ते इतिहास अभ्यासक, लेखक म्हणूनही कार्यरत आहेत.