कोल्हापूर : बालपणीच्या आठवणी, संघर्षाच्या काळावर मात करीत मिळवलेल्या यशावर टाकलेला प्रकाशझोत, प्रतिकूल परिस्थितीतील चढउतार मंगळवारी आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील यांनी उलगडले. आई शांतादेवी यांचा स्वभाव, संस्कार, कष्टाचा काळ आणि त्यांची दूरदृष्टी उलगडताना एकाक्षणी या सर्वच भावंडांंना सभागृहातच हुंदका फुटला. त्यांना पाहून उपस्थितांच्याही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. निमित्त होते, शांतादेवी पाटील यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे. आईनं आम्हांला वाढवलं..तिनंच घडवलं आणि दूरदृष्टी दिल्याने जीवनाच्या विविध क्षेत्रांत आम्ही यशस्वी झाल्याची प्राजंळ कबुली पाचही बहीणभावडांनी दिली.आईबद्दल सगळेच भरभरून बोलले..त्या फक्त शांतपणे बसून होत्या..मुलांकडून होणारे कौतुक मनोमन साठवून ठेवत होत्या..जे पेरलं ते कसदार उगवलं याचाही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होता. भाग्यश्री पाटील यांनी मागच्या चाळीस वर्षांच्या आयुष्याचा पटच समोर उभा केला. त्या म्हणाल्या, आज डीवाय पाटील ग्रुपचे साम्राज्य पाहून सर्वांनाच त्याचे अप्रूप वाटते परंतु ही गोष्ट सहजासहजी झालेली नाही. आमचेही घराणे इतरांसारखेच सामान्य होते..वायरमन घरी आला की थकबाकी आहे म्हणून वीज कनेक्शन तो कापणार तरी नाही ना, अशी भीती आईला वाटायची..आईने ३० रुपयांवर महिना काढला आहे. आम्हा पाच भावंडांना आईने चुलीवरील भाकरी करून वाढल्या. तिने कालवून दिलेला दहीभात आम्ही एका ताटात खाल्ला. आज मागे वळून पाहताना ते कष्टदायी आयुष्य समोर उभे राहते. आम्ही ते जीवन जगलो आणि त्यामुळेच घडलो. ही सगळी आईच्या संस्काराची देण आहे.डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, आईच्या दूरदृष्टीमुळे आम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी झालो. दादा म्हणजे वडील पुणे, मुंंबईत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना आईने समर्थपणे साथ दिली. मुलांना इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्याचा आग्रह तिने धरला..त्याचे मोल आज आम्हाला कळले.आमदार सतेज पाटील म्हणाले, आम्ही दोन भाऊ, तीन बहिणींना सक्षम करण्यात आईचा सिंहाचा वाटा आहे. बालपणी आताचे वैभव नव्हते. शिक्षण घेताना केएमटी आणि सायकलने जावे लागले. मी सेंट झेवियर्समध्ये शिक्षण घेताना तिथे प्रवेश मिळावा म्हणून बहीण भाग्यश्री दहा-पंधरा दिवस शाळेच्या बाहेर थांबत असे. आमची शेती होती त्यामुळे एखाद्या आईने आम्ही शेती करावी असे सुचवले असते परंतु आमच्या आईने आम्हाला चांगले शिक्षण दिले. मी आणि भैया त्याकाळी श्रीराम दूध डेअरीमध्ये दूध घालायलाही जात असे.
दहावीत असताना विहीरडॉ. भाग्यश्री म्हणाल्या, भाऊ संजय यांनी दहावीत असताना शेतातील विहीर बांधली. त्यावेळी तो स्वत: वीट, वाळू मोजून घ्यायचा..त्याला या कामात घामाघूम होताना पाहिले आहे. आता त्याने काेट्यवधी रुपयांच्या मोठ्या इमारती बांधून घेतल्या. पंचतारांकित हॉटेल बांधून त्यामध्ये आईचा वाढदिवस साजरा केला. तो कर्तबगारीने खूप मोठा झाला. परंतु या सगळ्याच्या तळाशी आई भक्कमपणे उभी राहिली.
घराण्याचे नाव पुढे नेऊ..जे आजोबांनी सुरू केले, ते वडील व काकांनी वाढवले..तीच परंपरा पुढे नेत डी.वाय.पाटील यांचे नाव मोठे करण्याची ग्वाही तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.