लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांबरोबरच त्यांच्या पालकांचेदेखील मानसिक आरोग्य बिघडले आहे. मुले आणि पालकांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होण्यासारखे प्रकार वाढले आहेत. त्यावर पालकांनी वेळीच सावध होऊन पाल्यांसमवेत सुसंवाद वाढविणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाइन पद्धतीने शाळा भरविण्यास सुरुवात केली. या माध्यमातून ऑफलाइन शिक्षणाला पर्याय मिळाला. मात्र, मोबाइलच्या अतिवापरामुळे आणि मैदानी खेळांवर मर्यादा आल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. मुलांच्या शिक्षणाची चिंता, त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरविताना होणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे पालकांची मानसिकताही बिघडत आहे. विद्यार्थी, पालकांमधील संवाद वाढल्यास मानसिकता योग्य राहण्यास मदत होणार आहे.
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली : ५५३०१
दुसरी : ५७४५२
तिसरी : ५७६०९
चौथी : ५७८३४
पाचवी : ५७८४१
सहावी : ५७३९५
सातवी : ५८३२०
आठवी : ५८८००
नववी : ६०२२६
दहावी : ५६७४५
मुलांच्या समस्या
१) आक्रमकता, चिडचिडेपणा वाढला
२) एकाग्रता कमी झाली
३) चंचलता वाढली
४) ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओचे व्यसन
पालकांच्या समस्या
१) मुलांवर राग काढणे, त्यांच्यावर वारंवार चिडणे
२) नैराश्याची वृत्तीमध्ये वाढ
३) मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत भीती
४) हतबलतेचे विचार
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात
कोरोनामुळे पारंपरिक ऑफलाइन शिक्षण पद्धत थांबून ऑफलाइनचा वापर वाढला आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुले गेमिंग, व्हिडिओच्या विळख्यात अडकत आहेत. त्यांच्यात चिडचिडपणा, आक्रमकता वाढत आहे. घरातील एकापेक्षा जास्त मुलांना ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा पुरविताना आर्थिक कसरतीमुळे पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यावर सुसंवाद वाढविणे चांगला पर्याय आहे.
-डॉ. निखिल चौगुले
ऑनलाइन शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे त्यांची एकाग्रता कमी होत असून, चंचलता वाढत आहे. नोकरी, व्यवसायातून घरी आल्यानंतर पालकांचादेखील स्क्रीन टाइम वाढला आहे. त्याचा परिणाम मुलांवरही होत आहे. त्यावर पालकांनी मोबाइल वापरण्याबाबत स्वयंशिस्त बाळगावी. घरात आल्यानंतर मुलांसमवेत त्यांनी वाचन करावे. बुद्धिबळ, बैठे खेळ खेळावेत. त्यांच्याशी संवाद वाढवावा.
-डॉ. अश्विन शहा
220821\22kol_1_22082021_5.jpg
डमी (२२०८२०२१-कोल-डमी १०८०)