महेशआठल्ये
म्हासुर्ली/कोल्हापूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेचा फोटो श्रीकांत ऱ्हायकर या शिक्षकाने व्हायरल करताच तिच्या नातेवाईकांनी हे फोटो पाहुन तात्काळ संपर्क साधून या महिलेस पुन्हा सन्मानाने आपल्या घरी नेले आहे.
रुई (ता हातकणंगले ) मूळगाव असलेल्या सुशीला लक्ष्मण कुंभार या विवाहित महिलेने गेल्या वर्षी मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत घर सोडले होते .गेल्या वर्षभरापासून तिच्या नातेवाईकांना तिचा ठावठिकाणा सापडत नव्हता.
दरम्यानच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून धामणी - तुळशी परिसरातील गावांमध्ये रात्री -अपरात्री एक महिला डोक्यावर गाठोडे, हातात पातेलं, अंगावरील मळकटलेले कपडे अशा अवस्थेत फिरताना अनेकांनी पाहिली होती. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे तिच्या जवळपासही कोणी जात नव्हते. त्यामुळे तिला जेवण सोडा, साधे पाणीही कोण देत नसे. यामुळे तिची शारीरिक स्थिती कमजोर झाली होती. याच परिस्थितीत ती गेल्या महिन्यापासून धामोड येथील सह्याद्री हायस्कूल व ज्युनि कॉलेजच्या परिसरात रहात होती.
याच शाळेतील शिक्षक श्रीकांत ऱ्हायकर यांनी तिला रोज चहा,नाष्टा तसेच जेवणाचीही सोय केली. त्यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने १०९१ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून या महिलेबाबत माहिती कळविली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हायरल केले. आणि राधानगरी पोलिसांशीही संपर्क साधला.
त्यामुळे या महिलेच्या नातेवाईकांंनी या शिक्षकांशी संपर्क साधून या महिलेला घरी घेऊन जाण्यासाठी तात्काळ दाखल झाले आणि या महिलेस तिच्या हक्काचे घर पुन्हा मिळाले