कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे ‘विष्णुपत्नी लक्ष्मीकरण’ करण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांनी जनआंदोलन करून हाणून पाडला आहे व या लढ्यात आम्ही यशस्वीदेखील झालो आहोत. मात्र ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत देवीचा पुन्हा ‘महालक्ष्मी’ असा उल्लेख होत असून, त्याऐवजी ‘अंबाबाई’ या नावाचा वापर करावा, अशी मागणी शनिवारी अंबाबाईच्या भक्तांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन स्टार प्रवाह चॅनेलसह निर्मात्यांना चित्रनगरी येथे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मराठी चित्रपट आणि नाट्य विभागामधील नामवंत अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांची मालिका प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे.
त्यामध्ये एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या वतीने एक अक्षम्य अशी चूक घडली आहे, ती म्हणजे कोल्हापूरची करवीरनिवासिनी ‘श्री आई अंबाबाई’ या स्पष्ट नामोच्चाराऐवजी ‘श्री महालक्ष्मी’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
गेली पाच वर्षे झाले आम्ही कोल्हापूरकर श्री आई अंबाबाईच्या निगडित अनेक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी धडपडत आहोत. मग तो स्त्रियांच्या गाभारा प्रवेश असो, जुने फलक हटवून नवीन फलक लावणे असो किंवा हा देवीच्या नामाचा नाजूक विषय असो; ह्या प्रत्येक कारणासाठी आम्ही करवीरवासी यांनी जनआंदोलने केली आहेत व यशस्वीही झालो आहोत.
तरी महेश कोठारे यांना समस्त करवीरवासीयांकडून विनंती आहे की, ही झालेली चूक दुरुस्त करावी. यावेळी बाबा पार्टे, संदीप घाटगे, विवेक कोरडे, किरण पोवार, स्वप्निल पार्टे, रवी इनामदार, वैशाली महाडिक, संपदा मुळेकर, रूपाली पाटील, नीता पडळकर, विद्या घोरपडे, जयकुमार शिंदे, शुभांगी साखरे, मंगल खुडे, निकीता कापसे, सरिता घाटगे उपस्थित होत्या.