कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यातील चर्चेनंतर शहरातील अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून काढला गेला. त्यामुळे त्याच्या विरोधशत तीव्र प्रतिक्रिया व्यापारीवर्गात उमटल्या. कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्सच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या आदेशाला विरोध दर्शविला.
मंगळवारी नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त व्यापारी, चेंबरचे पदाधिकारीही रस्त्यावर आले. महाद्वार रोडवर त्यांनी महापालिकेची ही मोहीम बंद पाडली. यावेळी अनेक दुकानदार, व्यापारीही तेथे जमले होते.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आम्हाला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे मान्य केले आहे. बुधवारी त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. तोपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मनपा अधिकारी सचिन जाधव यांच्याकडे केली. बुधवारी बैठकीत काय निर्णय होईल तो होऊ दे, मात्र आज तुम्हाला दुकाने बंद ठेवावीच लागतील, असे जाधव यांनी स्पष्ट केले. बराच वेळ हा वाद सुरू होता.
चेंबरचे पदाधिकारी व महापालिकेचे कर्मचारी अधिकारी आमने-सामने आल्याचे कळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात चर्चेला बोलावले. त्यानंतर पदाधिकारी दुपारी साडेबारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले तेथे बलकवडे यांच्याबरोबर चर्चा झाली. आज, बुधवारी पालकमंत्र्यांनी सांगितले तर दुकाने उघडी ठेवा. एक दिवस थांबा, अशा शब्दांत बलकवडे यांनी त्यांची समजूत काढली. यावेळी संजय शेटे, संजय पाटील, शिवाजीराव पोवार, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, वैभव सावर्डेकर, कुलदीप गायकवाड उपस्थित होते.
निर्णय काहीही घ्या, दुकाने सुरूच ठेवणार -
दुपारी चेंबरच्या कार्यालयात दुकानदार, व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये पालकमंत्री काहीही निर्णय घेऊ देत, आपण कोणत्याही परिस्थितीत सर्व दुकाने, व्यवहार सुरूच ठेवायचे, असा ठाम निर्णय घेण्यात आला. व्यवहार बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.