कोल्हापूर : शहरातील व्यापारी, दुकानदार आज, सोमवारपासून दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. पण सरकारने रविवारी रात्री उशिरापर्यंत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही सरसकट दुकाने सुरू झाल्यास व्यापारी आणि महापालिका, पोलिसांचे कारवाई पथक आमने, सामने येऊन संघर्ष होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात व्यापारी आक्रमक झाल्यानंतर सरकारने पाच दिवस प्रायोगिक तत्त्वावर सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवा, सुविधा वगळता इतर दुकाने उघण्यावर निर्बंध लावले आहेत. पण हे निर्बंध व्यापाऱ्यांना मान्य नाहीत. शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्याच्या आत आहे. यामुळे सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर रविवारी रात्री उशिरापर्यंत निर्णय झालेला नाही. म्हणून सराफ संघाने दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राजारामपुरी व्यापारी असोसिएशननेही सायंकाळी बैठक घेऊन व्यापारी दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे हेही आमदार चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क साधून सरकारी पातळीवर परवानगीसाठी पाठपुरावा करीत राहिले. अधिकृत परवानगी नाही मिळाली तरी शहरातील सरसकट दुकाने सुरू झाल्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेणार, यासंबंधी उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, गेल्या रविवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासंबंधीचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने शहरातून संचलन करून व्यापारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. अशाप्रकारचे पाऊल यावेळी पोलिसांकडून उचलण्यात आलेेले नाही. म्हणून दुकाने उघडल्यानंतर पोलीस कारवाई करणार काय, यासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे. जर कारवाई केली तर संघर्ष अटळ आहे. व्यापाऱ्यांच्या असंतोषला लोकप्रतिनिधींनाही सामोरे जावे लागणार आहे. यामुळे अधिकृत परवानगी नाही मिळाली तरी व्यापक प्रमाणात कारवाई नाही झाली तर सरसकट दुकाने उघडण्यास मूकसंमती असल्याचा संदेश जाणार आहे.