कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना संसर्ग जास्त असल्याने आपला जिल्हा स्तर चारमध्ये आहे. त्यामुळे मी व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती करत आहे. रविवारी आपला पॉझिटिव्हिटी रेट ९.९५ टक्के होता, हळूहळू संसर्ग कमी होत असून तो आणखी कमी व्हावा यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत, त्यामुळे आणखी आठवडाभर धीर धरा, सगळे सुरळीत होईल, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुंबईनंतर कोल्हापुरात सर्वात जास्त टेस्टिंग होत असून परिणामी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. तो आणखी कमी व्हावा यासाठी घरात राहून उपचार आता बंद करण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाईल. राधानगरीसारख्या ठिकाणी काही गावे हॉटस्पॉट ठरत असून तेथे चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. आणखी आठवडाभर खबरदारी घेतली तर आपला पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन सगळे सुरळीत होईल.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्राने खासगी आस्थापनांना सीएसआर फंडातून लस खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अशा खासगी आस्थापनांनी पुढे येऊन नागरिकांच्या लसीकरणावर भर द्यावा, त्यामुळे जिल्ह्यात ७० टक्के लसीकरणाचा टप्पा लवकर पूर्ण होईल, केंद्रांवर गर्दी होणार नाही. संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्यास मदत होईल.
सीपीआरमधील स्थिती
एकूण रुग्ण : ४८०
कोविड रुग्ण : ३७८
व्हेंटिलेटरवरील रुग्ण : ७५
ऑक्सिजनवरील रुग्ण : २७८
----
लसीकरणासाठी कारखाने, बँका, खासगी कार्यालयांनी पुढे यावे
मुश्रीफ म्हणाले, कोरोना लसीचे वाटप केंद्राकडे असल्याने कोल्हापूरची लस टोचण्याची क्षमता चांगली असूनही अपेक्षित प्रमाणात लस उपलब्ध नाहीत. त्यामुळे कारखाने, बँका, खासगी आस्थापना आणि कंपन्यांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, आपल्या सीएसआर फंडातून कर्मचाऱ्यांचे, नागरिकांचे लसीकरण करावे. सध्या ॲस्टर आधारमध्ये १० हजार कोव्हॅक्सिन लस शिल्लक आहेत. जे लस विकत घेऊ शकतात, ज्यांची ऐपत आहे त्यांनी खासगी रुग्णालयांमधून लस घ्यावी.
--
फोटो नं १२०७२०२१-कोल-कोरोना बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
---