कोल्हापूर : गेल्या दोन-तीन दिवसापासून कोल्हापूरच्यातापमानात कमालीची वाढ झाली असून पारा ३८ डिग्रीपर्यंत पोहचला आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंग भाजून निघणारे ऊन जाणवते. आगामी दोन दिवस तापमान असेच राहणार असून त्यानंतर मात्र तापमानात किंचीत घट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.यंदा फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका राहिला. त्यानंतर एकदमच थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत गेली. दोन दिवस तर तापमानात कमालीची वाढ झाली असून साधारणता गेल्या आठवड्यापेक्षा सरासरी ७ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे.सकाळी सुर्यनारायणाने दर्शन दिल्यापासून तप्त सुर्य किरणांचा मारा सुरू होतो. नऊ वाजता तर अंग भाजण्यास सुरूवात होते. त्यानंतर पारा जस जसा वाढत जाईल तशी नागरिकांची घालमेल सुरू होते. दुपारी बारा वाजता तर घराबाहेर पडू वाटत नाही. दुपारी चार नंतर हळूहळू तापमान कमी होत जाते. शनिवारी दिवसभरात किमान २१ तर कमाल ३८ डिग्री तापमानाची नोंद झाली.फेबु्रवारी मध्ये तापमान असे असेल तर मार्च ते में पर्यंत सुर्य आग ओकण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आगामी दोन दिवस असेच तापमान राहू शकते. त्यानंतर मात्र तापमानात घट होईल, पण ते ३२ डिग्री पर्यंत कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.वाढलेल्या तापमानाचा सर्वांनाच फटका बसत असून दैनंदिन कामकाजावरही हळूहळू परिणाम होऊ लागला आहे. पिकांची पाण्याची भूक वाढली असून माळरान व खडकाळ जमिनीवरील पिके पाणी देऊन दोन दिवस झाले की माना टाकू लागल्या आहेत.