गारगोटी : अनियमित वेतन, कमी पगार , आर्थिक हालअपेष्टा यातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी गारगोटी आगार कर्मचाऱ्यांतून होत आहे.
कोरोना काळात पगार थकल्याने आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज मंगळवारी गारगोटी आगारात श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
नियमित वेतन नसल्याने कर्जाचा बोजा वाढत आहे.कोरोना काळात आर्थिक अडचण झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झालेले आहे. या नैराश्येतून कर्मचारी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. याकडे शासनाने गांभीर्याने वेळीच लक्ष दिले पाहिजे आणि तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात समावेश करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तत्काळ वेतन व नियम लागू करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
अहमदपूर, लेव्हास, शहादा, कंधार, साक्री येथील कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांना सर्व आगार कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आगारातील कर्मचारी उद्धव गिरी, अनिल चौगले, संदीप रानमाळे, तानाजी संकपाळ , नितीन सनगर आदीसह आगार कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ
- गारगोटी : येथे एसटी आगार कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य शासनात एसटीचे विलीनीकरण व्हावे यासाठी मागणी करताना आगारातील कर्मचारी उद्धव गिरी, अनिल चौगले, संदीप रानमाळे, तानाजी संकपाळ, नितीन सनगर व इतर.