कोल्हापूर : ‘फेटेवाला पैलवान’ असो अथवा ‘गोरिला माकड’, या प्रतिकृतींच्या माध्यमातून करमणूक करण्याबरोबरच समाजप्रबोधनाची २५ वर्षांची परंपरा सांगरूळच्या चंद्रकांत जंगम यांनी कायम राखली आहे. यावर्षी त्यांनी उंदराच्या पाच फूट उंचीच्या तांत्रिक देखाव्यातून स्वच्छतेचे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य कुटुंबात जन्माला आलेले चंद्रकांत जंगम यांना लहानपणापासूनच पेंटिंगची हौस होती. दहावी पूर्ण होताच त्यांनी हातात ब्रश धरला. पेंटिंग व्यवसायातून त्यांचा उदारनिर्वाह सुरू राहिला; पण समाजातील विविध प्रथा, त्यातून निसर्गाचा ढासळणारा समतोल याबद्दलची तळमळ त्यांच्या मनातून जात नव्हती. यासाठी त्यांनी विविध पक्षी, जनावरे यांच्या प्रतिकृती करून त्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यास सुरुवात केली. गेली पंचवीस वर्षे ते झपाटल्यासारखे काम करीत आहेत. प्रत्येक गणेशोत्सवात वेगवेगळ्या प्रतिकृती करायच्या आणि तरुण मंडळांच्या माध्यमातून त्या समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. आतापर्यंत त्यांनी ‘गॉडझिला’, ‘ विश्वविनायक’, ‘अॅनाकोंडा’, ‘गोरिला माकड’, ‘फेटेवाला पैलवान’, ‘कोंबडा’, ‘चिनी राक्षस,’ आदी एकापेक्षा एक अशा भन्नाट प्रतिकृती तयार केल्या आहेत. या प्रत्येक प्रतिकृतीचा त्यांनी समाजप्रबोधनासाठीच वापर केला. गणेशोत्सवात या प्रतिकृती करमणुकीचे माध्यम म्हणून जरी दिसत असल्या तरी त्यांतून चंद्रकांत जंगम यांचे समाजातील अनिष्ट प्रथा व सवयींवर प्रकाश टाकण्याचे काम सुरू आहे. यावर्षी त्यांनी पाच फूट उंचीचे सोळा उंदीर तयार केले आहेत. एकाच वेळी चार उंदीर विविध प्रकारचे संदेश देणार आहेत. यामध्ये कचरा, पाणी, प्लास्टिक, व्यसनांतून होणारी अस्वच्छता, आदी विषयांवर ते प्रबोधन करणार आहेत. या तांत्रिक देखाव्यांचे चंदगड, बेळगाव, संकेश्वर, रत्नागिरी, सातारा येथील मंडळांनी बुकिंग केले आहे. जंगम यांना देखावे तयार करण्यासाठी मुलगा विनय व मित्र आनंदा खाडे यांचे सहकार्य लाभते. या देखाव्यातून पैसे किती मिळतात यापेक्षा सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून २५ वर्षे अविरतपणे काम करीत आहे. माझ्या प्रबोधनाला कदाचित मर्यादाही असतील; पण येथून पुढेही मी हे काम करीत राहणार आहे. - चंद्रकांत जंगम
तांत्रिक देखाव्यातून स्वच्छतेचा संदेश
By admin | Published: September 18, 2015 11:58 PM