लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवरायांचे गडकिल्ले ही आपली अस्मिता असून ती जपली पाहिजे. त्यासाठी गडांचे पावित्र्य राखा, असा संदेश देणारे ‘मर्दासारखं वाग जरा...’ हे साडेतीन मिनिटांचे गाणे शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवारी प्रसारित करण्यात आले. यु ट्यूबवर प्रसारित करण्यात येणाऱ्या या गाण्याची निर्मिती हर्षल सुर्वे यांनी केली असून आमदार ऋतुराज पाटील यावेळी उपस्थित होते.
गडकिल्ल्यांवर केली जाणारी ओली पार्टी, अश्लील प्रकार, बार, परमिटरूम आणि वाईन शॉप यांना देण्यात येणारी गडकिल्ल्यांची नावे, याऐवजी गडांकडे शौर्यपीठ, शक्तिस्थान म्हणून पाहावे आणि शिवरायांची अस्मिता जपावी, असा संदेश या गाण्यातून तरुणाईला देण्यात आला आहे.
आमदार ऋतुराज पाटील, हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या गाण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सहकार्य केले आहे. स्वत: हर्षल सुर्वे यांनी प्रथमच हे गाणे गायिले आहे. पन्हाळा आणि पावनगड या किल्ल्यांवर झालेल्या चित्रीकरणात सुमारे ४० स्थानिक कलाकारांचा समावेश आहे. या गाण्याचे लेखन, संगीत, संकलन, छायांकन कोल्हापुरातील तंंत्रज्ञ आणि कलाकारांनी केले असून मुंबईचे नितीन जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे.
ऐश्वर्य मालगावे हे संगीतकार असून युवराज पाटील हे गीतकार आहेत. शेखर गुरव यांचे संकलन, चेतन कुंभार यांचे छायांकन, दत्तात्रय जगताप यांची रंगभूषा असून सुचित पोतदार यांनी पोस्टर, अजय हारुंगले यांचे छायाचित्रण, तर ओंकार झिरंगे यांनी ड्रोनचे व्यवस्थापन केले आहे. निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार, कुलदीप शिंगटे, अभिनेता स्वप्नील राजशेखर, अब्दुल रझाक पटेल, अमित अडसूळ यांनी विशेष सहकार्य केले आहे.
बार, परमिट रूम आणि वाईन शॉप यांना गडकिल्ल्यांची नावे देऊ नयेत यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
(संदीप आडनाईक)