म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील धान्य गोदामाच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात घुशी लागल्याने गरिबांसाठी येणाऱ्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत होती. याबाबत २५ डिसेंबरला सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच या प्रश्नाकडे गांभीर्याने घेत तालुका संघाच्या प्रशासनाने धान्य वितरणासाठी पर्यायी जागा पाहून त्यामध्ये धान्य वितरणाची व्यवस्था केली आहे.कागल तालुक्यात लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या या गावामध्ये गरिबांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याचे वितरण कागल तालुका खरेदी-विक्री संघाच्या शाखेमार्फत केले जाते. बसस्थानकाशेजारीच असणाऱ्या एका खासगी मालकीच्या जुनाट इमारतीत ही शाखा सुरू आहे; परंतु या इमारतीमध्ये घुशींनी मोठमोठे खड्डे पाडून धान्य फस्त करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी करण्याचा जणू अनेक वर्षांपासूनचा दिनक्रम आखला होता. मात्र, याकडे राजकीय नेत्यांसह तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयानेही कानाडोळाच केला होता.‘लोकमत’मधून बातमी प्रसिद्ध होताच पंचायत समिती सदस्य ए. वाय पाटील, तलाठी व्ही. आर. पोवार, ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे यांनी धान्य गोदामाची पाहणी करून येथील शाखाधिकारी नामदेव खतकर यांना सूचना दिल्या होत्या.तसेच तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अरुण भोसले यांनीही मंगळवारी (दि. ६) प्रत्यक्ष पाहणी करून धान्य गोदाम अन्यत्र हलविण्याविषयी प्रशासनाशी चर्चा केली. त्याप्रमाणे याच इमारतीच्यासमोर असणाऱ्या सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या गोदामामध्ये गावच्या सोयीसाठी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, ए. वाय. पाटील, आनंदा पाटील, विलास पाटील, नितीन पाटील यांनी धान्य वितरण करण्यासाठी जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर त्वरित धान्य गोदाम स्थलांतरित करण्यात आले.
म्हाकवेतील धान्य गोदाम हलविले
By admin | Published: January 08, 2015 12:22 AM