सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅॅनिटायझरचा वापर, आदी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) ते रविवार (दि. २३) पर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याबाबतची भूमिका उद्योजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी गुरुवारी दुपारी झालेल्या बैठकीत जाहीर केली. शनिवारी (दि. १५) मध्यरात्रीपासून दि. २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने वगळता अन्य उद्योग, कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी विजेचा स्थिर आकार, कामगारांचे वेतन, आदींबाबत केलेल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. कोरोनाला रोखण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन पाळून सर्व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, ‘मॅॅक’चे अध्यक्ष गोरख माळी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.
चौकट
विजेचा स्थिर आकार रद्द करावा
या लॉकडाऊनच्या काळातील उद्योगांचा विजेचा स्थिर आकार रद्द करण्यात यावा. बँकांनी व्याज आकारू नये. उद्योग बंद राहणाऱ्या काळातील कामगारांचे वेतन राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी उद्योजकांच्यावतीने आम्ही आमदार जाधव यांच्याकडे केली असल्याचे ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतनिहाय आकडेवारी
वसाहत उद्योग कामगार
शिरोली १००० ३००००
गोकुळ शिरगाव ८०० १५०००
कागल-हातकणंगले ४५० ४००००