सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील वाघवेपैकी कुऱ्हाडवाडी येथे बंगल्याचा जिना चढताना खांद्यावरील लोखंडी सळीचा स्पर्श ११ हजार केव्हीच्या विद्युत वाहिनीला होऊन वीजेच्या धक्क्याने परप्रांतीय बांधकाम मजूराचा मृत्यू झाला. सुरेश सुखदेव हसबे (वय २१, रा. उकली, ता.बागेवाडी, जि.विजापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, शनिवारी (दि.२९) रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.पोलिसांकडून, घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याचे नवीन क्रॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. वाघवे ते पिंपळे तर्फ ठाणे दरम्यानच्या रस्त्यावरील जकिन ओढाचे नवीन बांधकाम सुरू आहे. या कामासाठी सुरेश हसबे हा तरुण आपल्या सहकार्यसमवेत विजापूरहून आठ दिवसापूर्वी वाघवे येथे आला होता. वाघवेपैकी कुऱ्हाडवाडी फाट्याजवळील एका बंगल्यात भाडोत्री म्हणून राहत होते. सुरेश शनिवारी सकाळी पुलाच्या ठिकाणी काम करून, राहत असलेल्या बंगल्यावर खांद्यावर लोखंडी सळी घेवून जीना चढत होते. दरम्यान खाद्यांवरील लोखंडी सळीचा स्पर्श बंगल्यावरून गेलेल्या विद्युत वाहिनीला झाल्याने विजेचा जोराचा धक्का बसल्याने ते जीनाच्या पायऱ्यावर कोसळले. त्यांना बेशुध्द अवस्थेत उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
Kolhapur: लोखंडी सळी विद्युत वाहिनीला लागली, विजेच्या धक्क्याने परप्रांतीय बांधकाम मजूराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 7:19 PM