कोल्हापूर : अतिवृष्टी, धरणांतून वाढलेला पाण्याचा विसर्ग या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ व रेस्क्यू टीमच्या सहकार्याने आंबेवाडी आणि चिखली येथील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गावांना भेट देवून नागरिकांना स्थलांतराची सुचना केली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार गावांमधील १७०९ व्यक्तींचे व ३६५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरसह धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे पून्हा उघडले असून लहान मोठ्या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे गेली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी दोलत देसाई यांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना जनावरांसह स्थलांतर करण्याची सुचना केली. आतापर्यंत एनडीआरएफ व रेसक्यू टीमच्या सहकार्याने जवळपास ४० टक्के नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
करवीर तालुक्यातील चिखली गावातील ८९५ व्यक्ती २३७ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील ६१५ व्यक्ती ११२ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड- बाधित १ गावातील ४५ कुटुंबांतील १८४ व्यक्ती, १६ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील ८ कुटुंबांतील १५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
शहरातील संक्रमण शिबिरात १५ जण
कोल्हापूर शहरात उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबिरात ५ पुरुष, ९ महिला तर १ लहान मूल अशा १५ जणांचा समावेश आहे.