शिरोळ/कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यात महापुराची स्थिती निर्माण झाली असून बचावकार्यासाठी लष्कराच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. संभाव्य पुराचा धोका ओळखून जवळपास ३९ गावातील ४५ हजारहून अधिक नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले असून या गावांमधील १७,९०९ जनावरांनादेखील गावांमधून बाहेर काढले गेले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, कृष्णा-पंचगंगा नदीने धोका पातळी ओलाडंली आहे. तर शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अर्जुनवाड-मिरज मार्गदेखील बंद झाला आहे.
कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शनिवारी सकाळी शिवतीर्थ रस्त्यावर पाणी आल्याने नृसिंहवाडी-कुरुंदवाड रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनेमुळे पूरबाधित नागरिकांनी पाणी येण्यापूर्वीच आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले आहेत. महापुराची भीषणता निर्माण झाली असली तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बस्तवाड गावाला बेटाचे स्वरूप आले असून महापुराचे पाणी वाढत असल्याने अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली जात आहेत. प्रशासनाने यांत्रिकी बोटी सज्ज ठेवल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आढावा घेतला जात आहे.
कुरूंदवाड शहरातील गोठणपूर, शिकलगार वसाहत, दौलतशहावली मार्केट परिसर, शिवतीर्थ, दलित वस्ती आदी भाग पाण्याने व्यापले असून अडीशेहून अधिक घरे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासन सतर्क असून विविध शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक हाॅल, दत्त कारखाना, गुरुदत्त कारखाना स्थलांतरितांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक, पाळीव जणावरे सुरक्षित आहेत. बचावकार्यासाठी लष्कराच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत.
नृसिंहवाडी: श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील नागरिकात महापुराच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात पाणी आल्याने दत्त मंदिरातील नारायण स्वामी यांचे मंदिरातील उत्सव मूर्ती काल रात्री उशिरा टेंबे स्वामी महाराज यांच्या मंदिरात आणण्यात आली व तेथेदेखील पहाटे नदीचे पाणी पोहचल्याने येथील परंपरेनुसार मानकरी श्री अनंत दत्तात्रय पुजारी यांच्या घरी श्रींची उत्सव मूर्ती वाजतगाजत आणण्यात आली.