कोपार्डे - गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने आलेल्या महापुराने शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. या तीन गावांतील नागरी वस्तीत पाणी शिरल्याने पाचशेच्या वर कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
भोगावती व पंचगंगेला आलेल्या पुराने शिंगणापूर गावातील नदीच्या बाजूला असणाऱ्या पाच गल्ल्या पाण्याखाली आल्या आहेत. येथील सव्वाशे कुटुंबांना ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेत स्थलांतरित करून त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. २०२० पेक्षाही महापुराने रौद्ररूप धारण केले असून मागील वर्षीपेक्षा यावर्षी दहा फुटाने जास्त पाणीपातळीत वाढ झाली आहे.
नागदेवाडी व हणमंतवाडी गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने या गावांची परिस्थिती चिंताजनक आहे. ग्रामपंचायतीने पुराचे पाणी चिरलेल्या घरातील ग्रामस्थांना स्थलांतरित केले असून जनावरांची सोय करण्यासाठी बालिंगा पंपिंग हाऊस परिसरात सोय केली आहे. पुराच्या पाण्यामुळे हणमंतवाडी व नागदेववाडी गावांना बेटाचे स्वरूप आले आहे
फोटो
शिंगणापूर येथे पूरग्रस्त नागरिकांना प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.