कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत महापुराचा फटका बसलेल्या सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांना महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून सुरक्षित सुटका केली. या सर्व कुटुंबांची महापालिकेने केलेल्या निवारा केंद्रातून राहण्याची सोय करण्यात आली आहे.
शहरात महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम गुरुवारी सायंकाळपासून सुरू होते. नागरिकांना आवाहन करूनही त्यांनी घरातून बाहेर पडण्यास उशीर केल्यामुळे शुक्रवारी पाणी घरात शिरायला लागल्यावर एकच धांदल उडाली. दुधाळी, उत्तरेश्वर, शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, खानविलकर पेट्रोल पंप, रमणमळा, न्यू पॅलेस मागील बाजू, बुद्धविहार कॉलनी, जिव्हाळा कॉलनी, कदमवाडी, जाधववाडी परिसरातील २०० ते २५० कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले होते.
शुक्रवार पेठ परिसरात ग. गो. जाधव विद्यालय, गुणे बोळ परिसर, जगद्गुरू मठ, मस्कृती तलाव परिसर, शिंगणापूर नाका परिसरात पुराचे पाणी वाढल्याने तेथील सर्व नागरिकांना ग.गो. जाधव शाळेत, तसेच राजमाता हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी या भागात फिरती करून लोकांना स्थलांतरचे आवाहन केले. सिद्धार्थनगर येथील तीन कुटुंबांतील १२ नागरिकांचे समाजमंदिर येथे स्थलांतर करण्यात आले आहे.
जिव्हाळा कॉलनी येथील १०० नागरिकांना फुलेवाडी शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. माजी नगरसेवक राहुल माने यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला.
पंचगंगा नदी रस्त्यावरील ५० नागरिकांना ग. गो. जाधव शाळेत स्थलांतरित केले. मस्कृती तलाव येथील नागरिकांना भजनी मंडळ उत्तरेश्वर महादेव मंदिराजवळील हॉलमध्ये आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले. सिद्धार्थनगर येथील दोन कुटुंबातील आठ व्यक्ती आंबेडकर शाळेत आहेत.
बुद्धविहार हॉल येथे तीन कुटुंबांतील १० व्यक्तींना, तर सीता कॉलोनी येथील २८ नागरिकांना सारस्वत हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. के.एम.सी. कॉलेज येथे गवत मंडई परिसरातील ३० जनावरांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
शाहुपुरी व्यापार पेठ अंबाबाई शाळेतील निवारा केंद्रात १५ कुटुंबांतील ६५ व्यक्तींना, तर सिद्धार्थनगर येथील डॉ. आंबेडकर विद्यालय येथे एकूण पाच कुटुंबांतील २३, ज्ञानेश्वर भजनी मंडळ विठ्ठल मंदिर येथे आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले.