चंद्रकांत पाटील-- गगनबावडा -वन्यप्राण्यांच्या भीतीने पीक घेऊ शकत नाहीत. लाकूड फाटा विकावा, तर वन विभागाची कारवाई होते. कवडीमोल किमतीत शहरवासीयांनी काबीज केलेल्या जमिनी यामुळे स्वत:च्या गावात जीणं महाग. गाव दोन ग्रामपंचायतींमध्ये विभागल्याने सुविधांचा बोजवारा. यामुळे शहरात मिळेल ते काम स्वीकारायचे या भावनेने चार वर्षांत एकापाठोपाठ एक गावकरी गेल्याने धुंदवडेपैकी कावळटेक (ता. गगनबावडा) ओस पडला आहे.सुरुवातीच्या काळापासून शासकीय सुविधांपासून दुर्लक्षित राहिल्याने धुंदवडेपैकी कावळटेक येथील धनगरवाड्यातील लोकांवर स्थलांतरित होण्याची नामुष्कीजनक वेळ आली आहे. कावळटेकच्या चारी बाजूंनी खोल दऱ्या, सभोवताली दाट झाडी, जंगली प्राण्यांची आश्रयस्थाने असली, तरी येथील लोकांचे जीवन सुखी व समाधानी होते. येथे विस्कळीतपणे वसलेली केंबळा व कुडाची ६३ घरे होती. वाळलेल्या लाकडाच्या मोळ्या शेजारच्या गावात जाऊन विकणे. करवंदे, जांभूळ, आंबा, फणस, चिकण्या, नेरली, तोरणे, आदी फळे, कडीपत्ता, तमालपत्री यासारखी मसालेदार पाने, साली, मध विकून येथील लोकांचा कसातरी उदरनिर्वाह व्हायचा. धुंदवडे, खेरिवडे, चौधरवाडी, अणदूर, मणदूर येथे पूर्वी चालणाऱ्या गुऱ्हाळघरांत केलेली हंगामी मजुरी कुटुंबाला हातभार लावायची. साहजिकच येथील जीवन श्रीमंतीचे नसले तरी समाधानाचे होते.शेती करावी तर ती गव्यांकडून उद्ध्वस्त होते. त्यामुळे पिके बंद झाली. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई येथील लोकांना आतार्पंत एकदाही पोहोचली नाही. आयुष्याची भाकरी मिळवून देणारी शेती करणे अशक्य बनल्याने मुक्कामच धोक्याचा वाटू लागला. शहरातील धनवान मंडळींनी अल्प किमतीत येथील जमिनी विकत घेतल्या आहेत. सभोवतालचा भाग काबीज केल्याने येथील लोकांचा पारंपरिक पशूपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे वंचिताना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी धोरणात्मक कार्यक्रमाच्या वल्गना करणाऱ्या शासनाच्या काळात सुविधांअभावी स्थलांतरित होण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी शासकीय यंत्रणा तितकीच कारणीभूत आहे.सवलत रंकाना, लाभ मात्र रावांना...काही वर्षांपूर्वी कावळाटेक वसाहतीतील प्रत्येक घरास सौरऊर्जेवरील प्रत्येकी एक प्रमाणे दिवे दिले होते. मात्र, कोल्हापुरात गेलेल्या काही लोकांचे हे सौर दिवे येथे राहणारे शहरातील जमीनदार वापरत आहेत. यावरून सवलत रंकांना, लाभ मात्र रावांना अशी परिस्थिती येथे आहे.
धनगरवाड्यांवरील लोकांवर स्थलांतराची नामुष्की
By admin | Published: February 10, 2016 9:30 PM