कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप आणि जाचक शासकीय धोरण व त्रासदायक कार्यपद्धतीविरोधातील लढ्याचे पहिले पाऊल मंगळवारी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांनी ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या माध्यमातून टाकले. काम बंद ठेवून बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. शिवाय त्यांनी आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. घटस्थापनेचा मुहूर्त असतानाही या व्यावसायिकांनी ‘बंद’ पाळल्याने सुमारे पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली.शासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ‘क्रिडाई ठाणे’चे अध्यक्ष सूरज परमार यांनी ७ आॅक्टोबरला आत्महत्या करून आपले आयुष्य संपविले. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शासकीय बांधकाम परवानग्यांमध्ये होणारी प्रचंड दिरंगाई, सर्वच बाबतींत होणारा राजकीय हस्तक्षेप, शासकीय धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये जाणूनबुजून केला जाणारा उशीर, असे मुद्दे नोंदविले होते. त्यावर परमार यांच्या स्मृतीस अभिवादन आणि बांधकाम क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप व जाचक शासकीय धोरणांविरोधात लढा म्हणून ‘क्रिडाई’ या संघटनेच्या माध्यमातून देशभरात मंगळवारी काम बंद करण्यात आले. यात ‘क्रिडाई कोल्हापूर’चे सर्व सभासद बांधकाम व्यावसायिक व त्यांचे सुमारे साडेसहा हजार कामगार सहभागी झाले. यात क्रिडाई कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने दुपारी साडेबाराच्या सुमारास सासने मैदानाजवळील महानगरपालिकेच्या कार्यालयात आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन दिले. यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव आणि क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परीख यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्या व भूमिका मांडली. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना निवेदन दिले. यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सुजय होसमणी, सचिव विद्यानंद बेडेकर, राम पुरोहित, गिरीश रायबागे, कृष्णा पाटील, चेतन वसा, संजय डोईजड, प्रकाश मेडशिंगे, हेमांग शहा, नितीन जिरगे, विक्रांत जाधव, प्रमोद साळोखे, श्रेयांश मगदूम, विजय माणगावकर, प्रकाश देवळापूरकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, निवेदन देण्यासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चात बांधकाम व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी हे काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)बांधकाम क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप व जाचक शासकीय धोरणामुळे सूरज परमार यांचा बळी गेला. अशा पद्धतीने भविष्यात बांधकाम व्यावसायिकांच्या आत्महत्या वाढू नयेत यासाठी लढा म्हणून ‘काम बंद’च्या माध्यमातून पहिले पाऊल आम्ही उचलले आहे. देशभरातील या उद्रेकाची दखल घेऊन बांधकाम क्षेत्राला बळ देणारे नवे धोरण शासनाने राबवावे, ही अपेक्षा आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेकजण फ्लॅटचे बुकिंग करतात; तरीदेखील कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक आजच्या ‘बंद’मध्ये उर्त्स्फूतपणे सहभागी झाले. बंदमुळे साधारणत: सुमारे पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली.- महेश यादव, अध्यक्ष, क्रिडाई, कोल्हापूरबांधकाम व्यावसायिकांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत महानगरपालिकेच्या माध्यमातून सकारात्मक कार्यवाही केली जाईल. याबाबत नोव्हेंबरमध्ये बांधकाम व्यावसायिक व संघटनांची व्यापक बैठक घेतली जाईल.- पी. शिवशंकर, आयुक्त, महानगरपालिकाबिगरशेती परवाना पद्धत व बी टेन्युअरकामी होणारा विलंब टाळण्यासाठी त्वरित डेटा बँकेची सोय करून लवकरात लवकर ही प्रकरणे निर्गत केली जातील.- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारीपोलिसांकडून बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षिततेची हमी राहील. तसेच खंडणी व भ्रष्टाचारविरोधात पोलिसांकडून व्यावसायिकांना पूर्ण मदत केली जाईल.- डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षकपरमार यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराचा प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी शासनाने योग्य ती उपाययोजना करावी. तसेच बांधकाम व्यावसायिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे.- राजीव परीख, उपाध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र
क्रिडाईचा महापालिकेवर मूक मोर्चा
By admin | Published: October 14, 2015 12:37 AM