कोल्हापूर : चांदोली धरणापासून १०.४ किलोमीटर अंतरावर आंबा (ता. शाहूवाडी) परिसरात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला; त्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले. असे असले, तरी या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.चांदोली धरण येथे भूकंपमापन केंद्र आहे. या परिसरात भूकंपाचे छोटे-मोठे धक्के हे अधूनमधून बसत असल्याचे सांगितले जाते. रविवारी सकाळीही चांदोली धरणापासून १०.४ किलोमीटर अंतरावर दक्षिणेस आंबा परिसरात भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता २.९ रिक्टर स्केल होती; यामुळे जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी नागरिकांमध्ये घबराट उडाली. भूकंपाचा हा धक्का अतिसौम्य होता. ३.५० रिक्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रता जाणवल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते; कारण ही तीव्रता जास्त असते; परंतु आंबा परिसरात जाणवलेला धक्का हा धोक्याची घंटा नसणाऱ्या तसेच गांभीर्याने दखल घेण्याच्या निकषापेक्षा कमी असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.
आंबा परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:18 PM